औरंगाबादः

अल्पवयीन चोरांच्या त्रिकुटाने टपरी फोडली. टपरीत अंधार असल्याने आगपेटीची काडी ओढताच सॅनिटायर्सने भडका उडाला. त्यात एक १३ वर्षीय चोरटा भाजला. या अल्पवयीन चोराने आरडओरड केल्यामुळे गस्तीवरील जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर त्याला तेथेच सोडून दोन साथीदारांनी धुम ठोकली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने या चोराचे प्राण वाचले. ही घटना शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास शहानुरमिया दर्गा रोडवरील डीमार्टसमोर घडली. यात अल्पवयीन चोर ३० टक्के भाजला असून, त्याला घाटीत दाखल करण्यात आले आहे.
शहरात दुकाने आणि शटर उचकटणा-या अल्पवयीन चोरांनी सध्या पोलिसांच्या नाकात दम आणला आहे. नशेच्या भरात हि टोळी दुकाने फोडत असल्याचे समोर आले आहे. गारखेडा परिसरातील भारत नगरात राहणा-या रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलांची टोळी सध्या सक्रिय आहे. या टोळीने शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दर्गा चौकातील डिमार्ट समोर असलेल्या टपरीमालक शेख फैय्याज शेख हमीद यांच्या टपरीचे कुलूप तोडले. त्यानंतर १३ वर्षीय चोरटा टपरीत शिरला. त्याने आतून टपरी लावूनचा छोटा दरवाजा लावून घेतला. टपरीत अंधार असल्याने त्याने माचीसची काडी पेटवली. योगा योगाने त्या ठिकाणी सॅनटायझरच्या बाटल्या ठेवल्या होत्या. काडीने पेट घेताच अचानक भडका उडाला. आगीत माचीस, बिडी सिगारेट आणि रूमालाने पेट घेतला. आग भडकताच आतील चोरट्याने आरडाओरड सुरु केली. हा प्रकार पाहताच दोन्ही अल्पवयीन साथीदारांनी घटनास्थळावरून धुम ठोकली. यावेळी गस्तीवर असलेले गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांचे पथक दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस नाईक नंदकुमार दुर्बे, गणराज हे मोबाईल व्हॅनने दाखल झाले. तसेच जमादार निकम आणि बिट मार्शल सय्यद फहिम यांनी देखील धाव घेत टपरीमधील चोराला बाहेर काढले. यात त्याचे दोन्ही हात आणि तोंड भाजले होते. भाजलेल्या अवस्थेत त्याला तात्काळ घाटीत दाखल केले. आगीत टपरीतील साहित्य आणि टपरी असा एकुण ३० हजारांचा ऐवज जळुन खाक झाला. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
नागरिकांची बघ्याची भूमिकाः
टपरीत अल्पवयीन चोर भाजल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जवाहरनगर पोलिसांना माहिती दिली. जवाहरनगर पोलिस येईपर्यंत गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी थांबले होते. जवाहरनगरचे पोलिस नाईक नंदकुमार दुर्बे आणि गणराज हे मोबाईल व्हॅनने दाखल झाले. तोपर्यंत शंभर ते दोनशे जणांचा जमाव तेथे जमला. पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले. मात्र, परिसरातील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. एकही जण पोलिसांच्या मदतीला धावून आला नाही.