शिऊर  (विजय जाधव) :  कित्येक वर्षांपासून चुलीवर भाकरी करून कुटुंबाचे पोट भरणार्‍या कष्टकरी महिलांनी पै पै जोडून गॅस सिलिंडर घेतले. चुलीच्या धुरामुळे निर्माण होणार्‍या आरोग्याच्या समस्या आणि काबाडकष्टाचा पीळ त्यामुळे थोडा सैल झाला. मात्र आता लॉकडाउन, कोरोनाचा संसर्गाने कामाची चिंता, महागाईचा भडका, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती यामुळे महिला पुन्हा चुलीकडे वळाल्या आहेत. पोट भरायला पुरेसा पैसा नाही, सिलिंडरवर इतके पैसे कुठून खर्च करायचे, असा प्रश्‍न त्या कष्टकरी महीलांसमोर उभा राहिला आहे.
गॅस सिलिंडर परवडत नाही म्हणून अनेक घरांत चुली पेटू लागल्या आहेत. पण या महागाईने आमच्या चुलीवरही पाणी ओतले आहे. ‘हाताशी काम नाही, पैसा नाही. आज ताटात भाकरी असेल की नाही, याची खात्री देता येत नाही. करोनाकाळामध्ये साथीचा संसर्ग फैलावू नये म्हणून काळजी घेतली जाते. पण लोकांचे पोट कसे भरेल याकडे कुणाचेही लक्ष नाही. महागाईमध्ये जगायचे कसे असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. कोरोनामुळे कामावर परिणाम झाला. घरात येणारा आर्थिक स्त्रोत आटला आणि महागाई मात्र वाढत आहे. पैसे कुठून आणणार? किराणा, भाजीपाला यांचे दर चढतेच आहेत. त्यात भर म्हणून गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. त्यामुळे चुलीचाच पर्याय ग्रामीण भागातील नागरिकांनी स्विकारला असल्याचे दिसून येत आहे..तेलासह डाळी महागल्या असून हाताला काम नाही अशा परिस्थितीत जगावे तरी कसे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच गॅस सिलिंडरच्या दराने गगन घाटल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चुली पेटल्याचे दिसत आहे.


पुन्हा त्रासाचेच दिवस : महिला मंडळ प्रतिनिधी तथा आरोग्य सेवीका वंदना गायकवाड यांनी गॅसची सुविधा गावामध्ये हवी, यासाठी महिलांच्या आरोग्याचा, श्वसनविकार होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा मुद्दा वारंवार पुढे मांडण्यात आला. तो योग्यही होता. पण, आज लॉकडाउनच्या काळात महिलांना रोजगार नाही. घरात पैसा येत नसताना चुलीच्या धुराशिवाय पर्याय नाही. हातात चार पैसे आल्यानंतर ग्रामीण भागातल्या माणसांचे जगणेही बदलले. आता पुन्हा तेच कष्टाचे दिवस आले आहेत असे सांगितले.