औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापिठातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी लेखणी बंद अंदोलन पुकारले आहे. या अंदोलनामुळे विद्यापिठाच्या पदवी पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी शिंदे यांनी दिली.

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील कर्मचा-यांनी गुरुवारपासून (दि.24) लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. दुस-या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असून परीक्षा विभागाचे काम पुर्णत: ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबर पासून ‘काम बंद‘ आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिका-यांसोबत बैठक होऊनही सोमवारी (दि.28) तोडगा न निघाल्याने संप सुरुच आहे. त्यामुळे पदवी पदव्युत्तर परिक्षांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे परिक्षा होणार की नाही याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

आज (दि. 29) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिष्ठाता, प्र-कुलगुरू, परीक्षा मंडळ संचालक, कुलसचिव यांची महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत परिक्षा पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही.