औरंगाबाद - शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 29 डॉक्टरांची सेवा पालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहीत केली आहे. मात्र अनेक डॉक्टरांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. केवळ चार डॉक्टर पालिकेसोबत काम करण्यास तयार झाले आहे. या डॉक्टरांना चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाची साखळी अद्यापही खंडीत झालेली नाही. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये नियुक्‍त डॉक्टरांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. ही स्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 63 व 65 (1)(अ) मधील तरतुदीनुसार इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी उपलब्ध करून दिलेल्या यादीतील डॉक्टर्स व शहरातील खासगी व्यवसाय करणार्‍या 23 फिजिशियन, 6 अनेस्थिशियन अशा 29 डॉक्टरांच्या सेवा दरमहा 15 दिवसांची शिफ्ट व सात दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत.

हे आदेश 11 सप्टेंबरलाच जारी करण्यात आले आहे. मात्र या आदेशास सुरुवातीला सर्वच डॉक्टरांनी केराची टोपली दाखवली. दरम्यान चार डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांना पालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्ती दिली जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कारवाईचा इशारा, तरीही कानाडोळा
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात खासगी व्यावसायिक डॉक्टरांनी पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे तात्काळ रुजू व्हावे, अन्यथा संबंधितांविरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिलेला आहे. मात्र तरीही खासगी डॉक्टरांनी याकडे कानाडोळा केला आहे.