मुंबईः परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपले आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून १८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश भागात चांलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यातील या पावसामुळे सर्वाधिक मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक गेल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
१८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस पवार हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, औसा, परांडा, उस्मानाबाद आणि उमरगा येथील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच अतिवृष्टी झालेल्या विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला अत्यंत तुटपुंजी मदत केल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे.