औरंगाबाद / प्रतिनिधी,


राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी 152 कोटीचा निधी मंजूर केला आहे. एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि महापालिका या तीन एजन्सींच्या माध्यमातून रस्त्यांची कामे गतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यातील सात रस्ते कामांना मान्यता देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.


पालिकेने शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्ते कामांसाठी 152 कोटीचा निधी मंजूर केला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील 23 रस्त्यांची कामे एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि पालिका या तीन एजन्सींकरवी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि पालिकेने रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर एमआयडीसीने शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली. मात्र एमएसआरडीसी आणि पालिकेने निधी मंजूरीचे पत्र नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे या दोन एजन्सींकडून रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नाही. एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास संचालक मंडळाने मान्यता दिली. मात्र निधीबद्दल कोणतीही भुमिका स्पष्ट न केल्यामुळे रस्त्यांची कामे सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. एमएसआरडीसीकरवी शहरातील सात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.