औरंगाबाद / प्रतिनिधी,


कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने शहरात विनामास्क वावरणार्‍यांवर संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवरच आता शुक्रवार दि.11 पासून पालिका मुख्यालयात देखील विनामास्क एन्ट्री केल्यास 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरूवारी दि.10 अधिकार्‍यांना दिले.
पालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा क्रमांक-3 या इमारतींत कामानिमित्त येणार्‍या नागरिकांनी विनामास्क प्रवेश करू नये. तसेच दोन्ही इमारतींचे प्रवेश द्वारावर थर्मलगन आणि ऑक्सिमीटर चाचणी केल्याशिवाय प्रवेश करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. विनामास्क आणि थर्मलगन-ऑक्सिमीटर चाचणी केल्याशिवाय पालिका परिसरात प्रवेश करताना कुणी आढळल्यास इमारत परिसरात गस्तीवर असणारे माजी सैनिक त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल करतील. त्यामुळे दोन्ही इमारतींच्या प्रवेशद्वारावर थर्मलगन आणि ऑक्सिमीटरने कर्मचार्‍यांकडून तपासणी करून आणि मास्क लावूनच इमारतीत प्रवेश करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही हा आदेश लागू आहे.