औरंगाबाद :औरंगाबाद तालुका शिक्षक पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन थाटात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे याच पतसंस्थेच्या इमारत बांधकाम प्रकरणात दिशानिर्दशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याच्या कारणावर अपर लेखापरीक्षकांनी उपनिबंधकांना सादर केलेल्या चौकशी अहवालात संचालक मंडळाला दोषी ठरविले आहे. तसेच संचालक मंडळाविरोधात कारवाईची शिफारस देखील केली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थचे हर्सूल टी पॉईंट येथे भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे बांधकाम चर्चेत राहिले. या बांधकामात प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप शिक्षक संघटना समन्वय समितीने केला आहे. यातील दोषींवर कारवाईसाठी समितीने उपनिबंधकांकडे सलग पाठपुरावा केला. दरम्यान, या पाठपुराव्याला अखेरीस यश आले असल्याचे सामितीचे विजय साळकर यांनी म्हंटले आहे. अपर लेखापरीक्षकांनी उपबनिबंधकांना सादर केलेल्या चौकशी अहवालात इमारत बांधकाम प्रकरणात शिक्षक पतसंस्थेचे संचालक मंडळाला दोषी ठरवत कारवाईची शिफारस केली आहे. शिक्षक संघटना समन्वय समितीने याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तथापि, या परिस्थितीतही मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी पतसंस्थेचे माजी चेअरमन धोंडीबा ताठे, अण्णा पाटील, बी डी विखणकर, प्रेमराज कोळगे यांच्या हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था तालुका औरंगाबाद नूतन कार्यालय वरच्या मजल्यावर नवीन कार्यालयात स्थलांतरित केले गेले. याप्रसंगी विद्यमान चेअरमन संतोष ताठे यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेचा चढता आलेख पाहता भविष्यात पतसंस्थेमार्फत केला जाणार्‍या लाभान्वित योजना सांगितल्या. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी तर आभार सचिव रशीद बेग यांनी मानले. यावेळी व्हाइस चेअरमन त्रिशला कासलीवाल-लोहाडे, प्रकाश दाणे, राजेश भुसारी, महेंद्र बारवाल, किशोर कदम, अनिल देशमुख, संजय बुचडे, दिलीप ढाकणे, विजय साळकर, सदानंद माडेवार, रंजीत राठोड, सुषमा खरे, स्वाती गवई, मिनाक्षी राऊत, सविता नागरे, मंगला पठाडे पदाधिकारी व सभासदांची उपस्थिती होती.

तत्कालीन संचालक मंडळाची चूक : मागच्या संचालक मंडळाने वेळेत बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे प्लॉट जप्तीची नोटीस होती. परिणामी, आम्हाला बांधकाम करावे लागले. आम्ही त्यातील तज्ज्ञ नाही. हे करत असताना काही प्रशासकीय वा तांत्रिक चूका झाल्या असतील. मात्र पतसंस्थेत कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही.

संतोष ताठे, विद्यमान चेअरमन, शिक्षक पतसंस्था

आता मंडळ बरखास्त करावे : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने बांधकामात भ्रष्टाचार केला हे आता सिद्ध झाले आहे. याची तक्रार वर्षभरापूर्वीच शिक्षक समन्वय समितीने केली होती. तालुका उपनिबंधक यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण करून अहवाल दिला आहे. त्यामुळे आता हे संचालक मंडळ बरखास्त करून सहा वर्षासाठी निवडणूकीस अपात्र ठरवावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिक्षक समन्वय समिती न्यायालयात जाईल.

विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

चौकशीतील मुद्दे : बांधकाम व आर्किटेक्ट नेमणूकीच्या निविदा वर्तमानपत्रात जाहिरात न देता कशा प्राप्त झाल्या, ई टेन्डर, निवीदा मागवणे या पद्धती राबविल्या नाही, घरगुती कामाप्रमाणे काम केले, कंत्राटदारास टीडीएस कपात न करता पेमेन्ट अदा केले, बांधकाम चालू करतांना बांधकाम समिती सहकारामध्ये निर्माण करावी लागते ती संचालक मंडळाने निर्माण केली नाही, बांधकाम सुरू करण्यापूर्वी बांधकावर किती खर्च करायचा याचे अंदाजपत्रक तयार करून उपनिबंधक यांची मान्यता घ्यावी लागते ती संस्थेने घेतलेली नाही म्हणून हे बांधकाम नियमबाह्य आहे असा ठपका संचालक मंडळावर ठेवलेला आहे.