औरंगाबाद - राहते घर प्रशासनाने पाडले, आता आम्ही निर्वासित झालो असून, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी जयभवानी नगर येथील निर्वासितांनी बुधवारी (दि. 30) केली. याप्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सहकार्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटवून तिथेच स्वयंपाक करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनप्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख जयकिशन कांबळे यांनी सांगितले की, या देशात आणि राज्यात विकासाच्या नावाखाली रस्ते बांधणी, मोठ्या प्रकल्पांसाठी गोर गरीब जनतेची घरे पाडण्यात येतात. याच अंतर्गत जयभवानीनगरचे अतिक्रमण पाडून कित्येक वर्षे झाले आहे परंतु, येथील नागरिकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यांचा संघर्ष सुरूच आहे. या गरीब नागरिकांना एका रात्रीत बेघर करण्यात आले कष्टाने पैसे जमवून बांधलेले घरटे एका दिवसात मनपाने जमीनदोस्त केले. याचा न्याय मागण्यासाठी आज आपला मोडका संसार घेऊन हे आंदोलन करण्यात आले आहे. जर या नागरिकांना न्याय मिळाला नाही तर येणार्‍या दिवसात मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर आम्हाला बिर्‍हाड घेऊन चाल करावी लागेल असा इशारा संघटनेने यावेळी दिला. या घटनांचा येथील नागरिकांच्या मनावर मोठा परिणाम झाला असून त्यांना आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेने यावेळी मनपा प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

प्रशासनाच्या निषेध
या बिर्‍हाड आंदोलनादरम्यान नागरिकांनी चुल पेटवनु स्वयंपाक करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख जयकिशन कांबळे, प्रदेश महासचिव प्रा.अनिल गवळे, शहराध्यक्ष सुरज खाजेकर यांच्या सह गणेश काकडे, बाबुराव गोंड, बंडू मोरे, मारुती मुंदमले, शेख फयाज, इतबारे तसेच स्थानिक महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.