औरंगाबाद (उद्धव भा. काकडे) : महापालिका चालवित असलेल्या चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये कोरोना रूग्णांना उपचाराच्या चांगल्या व मोफत सुविधा मिळत आहेत. त्यामुळे हे सेंटर गरिबांसाठी आधारस्तंभ ठरले आहे. योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे कार्यरत आहे. त्यामुळे घाटी आणि जिल्हा सामान्य रूग्णालयापेक्षा गंभीर रूग्णांकडूनही उपचारासाठी मेल्ट्रॉन कोविड सेंटरलाच पसंती दिली जात आहे. परिणामी, कोरोनाचे रूग्ण वाढत असताना आजघडीला सर्वाधिक रूग्ण हे मेल्ट्रॉनमध्येच दाखल आहेत.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारामुळे मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत राज्य सरकारने एमआयडीसीच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरु करुन पालिकेच्या ताब्यात दिले आहे. सध्या या ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु आहे. तिनशे खाटांची क्षमता असलेल्या या सेंटरमध्ये ऑक्सिजनचे 124 बेडस् उपलब्ध आहेत. याच सेंटरसाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार केला जाणार असून तो तयार झाल्यावर 250 खाटांना ऑस्किजनचा पुरवठा होऊ शकेल. महिनाभरात हा प्लांट बसवला जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी नुकतेच सांगितले. या सेंटरमध्ये कोरोनाची लागण झालेले मध्यम व गंभीर रुग्ण दाखल केले जातात. त्यापैकी अनेकांना अन्यही आजार असतात, त्यामुळे सिटिस्कॅन आणि एक्स-रे काढण्याचीही गरज पडते. या बाबी लक्षात घेऊन पालिकेने शासन निधीतून एक्स-रे मशीन उपलब्ध केली. त्यानंतर बजाज उद्योग समुहाने या सेंटरसाठी सिटिस्कॅन मशीनही उपलब्ध करून दिली, ती नुकतीच कार्यान्वित झाली आहे. पालिका आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांच्या नियंत्रणात, नोडल अधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्या अधिपत्याखाली येथे रूग्णांना उपचाराच्या सर्व सुविधा दिल्या जात आहे. येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वैशाली मुदगडकर यांच्या देखरेखीत या सेंटरचे काम सुरू आहे. रूग्णालयाच्या स्वच्छतेवरही येथे विशेष लक्ष दिले जात आहे. येथे उपचाराची सुविधा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने घाटी, जिल्हा सामान्य रूग्णालयांऐवजी बहुतांश कोरोना रूग्णांकडूनही मेल्ट्रॉनमध्येच दाखल करण्यासाठी आग्रह केला जात असल्याचे समोर आले आहे.
 

खासगी रूग्णालयांपेक्षाही चोख व्यवस्था : मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये खासगी रूग्णालयापेक्षाही चांगली आरोग्य सुविधा मिळत आहे. त्यामुळे आजघडीला शहरात सक्रीय असलेल्या एकूण 956 रूग्णापैकी सर्वाधिक 135 रूग्ण एकट्या मेल्ट्रॉन सेंटरमध्ये आहेत. घाटीत 101, जिल्हा सामान्य रूग्णालयात 65, तर खासगीत मजीएम हॉस्पीटल 82, हेडगेवार हॉस्पीलटमध्ये 51 तर धूत हॉस्पीटलमध्ये 35 रूग्ण उपचार घेत आहेत.

मात्र गैरप्रकारांमुळे बदनामीचाही डाग : मेल्ट्रॉन सेंटरमध्ये एक्स-रे मशीन असतानाही मध्यंतरी महिनाभरापासून रूग्णांचे एक्स-रे काढले जात नसल्याचे समोर आले होते. एक्स-रे फिल्म उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र त्याच वेळी डॉ. पाडळकर यांनी एक्स-रे फिल्म आधीच उपलब्ध करून दिल्याचा खुलासा केला होता. शासकीय दवाखान्यांत मोफत सुविधा असताना येथे काही रूग्णांना रेमडेसिविरसह महागडे इंजेक्शन व गोळ्या बाहेरून आणण्यास सांगितले जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. असल्या प्रकारांमुळे या सेंटरची बदनामी होत आहे. असे प्रकार यापुढे होणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.