पूर्णा : साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नांदेडकडे जाणार्‍या एका क्रुझर जीपला पूर्णा नांदेड रस्त्यावरील नहापुर गावाजवळ अपघात झाला. टायर फुटून झालेल्या या अपघातात भावी नवरदेवासह चालक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह एकूण दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार 29 जुलै रोजी दुपारी घडली. जखमींवर पूर्णा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जीप चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील खाडे परिवारामधील विशाल खाडे या तरुणाचा नांदेड येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी खाडे कुटूंबीय एम.एच. 38 व्हि.0978 या वाहनाने नांदेडला जात होते. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील नहापुर गावाजवळ भरधाव क्रुझर गाडीच्या मागील बाजूचे टायर फुटले. त्यानंतर वाहनाने तीन पलट्या खाल्ल्या. अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकरी, वाहनधारक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. घटनेची माहिती चुडावा पोलिसांना देण्यात आली. फौजदार प्रकाश पंडित, जमादार सुर्यकांत केजगीर, म. शारेक, शिवाजी कदम हे घटनास्थळी दाखल झाले. गाडीचा चालक राहूल खाडे गंभीर जखमींना नांदेडला हलविण्यात आले आहे. तर इतर जखमी विशाल गणेश खाडे, मिलिंद मरीबा खाडे, संतोष नागोराव खाडे, सुदाम खोब्राजी खाडे, अरुष रवि खाडे, निकित रमेश खाडे, ऋतिक सुभाष खाडे (सर्व रा. हट्टा), भिकाजी शंकर पुंडगे यांच्यावर पूर्णेत उपचार सुरु आहेत.