औरंगाबाद / प्रतिनिधी,


महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्ण वार्‍यावर असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रुग्णांवरील उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यामुळे सतत बदलल्या जाणार्‍या औषधांमुळे रुग्ण त्रस्त होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध नाही. त्यामुळे देखील रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना रुग्णवाहिकेची तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
शहरात पालिकेने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. त्यापैकी किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरबद्दल तेथील एका रूग्णाने आपला अनुभव माध्यमांसमोर कथन केला. त्याने सांगितलेले अनुभव पालिकेच्या यंत्रणेच्या कारभारावर शंका उपस्थित करणारे आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केलेल्या कोरोनाबाधितांना दोन वेळचा चहा-नाष्टा आणि जेवण दिले जाते. त्याशिवाय काढा देखील दिला जातो. या बाबी महत्वाच्या असल्या तरी एवढ्याच बाबी महत्वाच्या आहेत, अशा पध्दतीने पालिकेची यंत्रणा या कोविड केअर सेंटरवर काम करताना दिसून येते. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले बहुतेक रुग्ण ताप आलेले, खोकल्याचे त्रस्त झालेले असतात. अनेकांना श्‍वास घेताना त्रास देखील होतो. त्यादृष्टीने नेमका उपचार मात्र केला जात नाही. सातत्याने औषधी बदलल्या जातात. कोरोना आजारावर नेमका उपचार नसला तरी ताप किंवा खोकला बरा होण्याच्या दृष्टीने औषधी उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेली औषधी योग्य प्रकारे दिली जाणे अपेक्षित असताना त्यात वारंवार बदल केला जातो. त्यामुळे कोरोनाबाधितांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णांच्या शरीरातील उष्णता वाढते, तोंड कोरडे पडते, अशा नवीन समस्या निर्माण होत आहेत. ज्या डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचार्‍यांबद्दल रुग्णांच्या मनात विश्‍वास निर्माण होतो, त्या डॉक्टरांना किंवा कर्मचार्‍यांना लगेचच बदलले जाते. त्याचा परिणाम रुग्णांच्या मानसिकतेवर होत असल्याचे किलेअर्कच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या काही जणांनी सांगितले. डॉक्टरांच्या आपापसातील हेव्यादाव्यांमुळे देखील रुग्णांचे हाल होतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.


अचानक त्रास, दोन तास प्रतीक्षा
पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसते. एका रुग्णाला रात्री साडेअकरा वाजता ऑक्सिजनचा त्रास सुरु झाला. त्याच्या शरीरामधील ऑक्सिजनचे प्रमाण घटले होते. कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांनी त्या रुग्णाला मिनी घाटीमध्ये हलवण्याचे ठरवले. मात्र त्या रुग्णाला घेवून जाण्यासाठी दीड-दोन तास रुग्णवाहिकाच आली नाही. दरम्यानच्या काळात त्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले. त्यामुळे त्याचे मिनी घाटीत जाणे टळले.


ऑक्सीजन सिलेंटरही अपुरे
पालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्ये केवळ पाच लिटरचेच छोटे ऑक्सीजन सिलेंडर आहेत. काही मिनीटात ते संपून जाते. या सिलेंडरचा जास्तीचा साठा नाही. त्यामुळे एखाद्या सिलेंडरनंतर रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले नाही तर त्याला इतरत्र हलवण्याची हालचाल सुरु केली जाते. जास्त क्षमतेचे ऑक्सिजन सिलेडर कोविड केअर सेंटरमध्ये असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.