चिंचोली लिंबाजी : कन्‍नड तालुक्यातील रेऊळगाव ते वाकी या रस्त्यावरील नागझरी नदीवरील पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. हा पुल वाहनधारकांसाठी जिवघेणा ठरत असून संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेऊळगाव जवळील नागझरी नाल्यावरील नळकांडी पूल वाहून गेला होता. त्यामुळे पुलावर मोठा खड्डा पडला असून अद्याप पूल व खड्डा दुरुस्त न केल्याने वाहन धारकांनसाठी तो जीवघेणा बनला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे  वेळोवेळी पूल दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाइलाजाने ग्रामस्थ गेल्या दीड वर्षापासून याच पुलाहून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. असे असतानाही संबंधित अधिकार्‍यांना अद्याप जाग आलेली नाही. रात्रीच्यावेळी अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर पूल दुरुस्त करण्यात यावा. अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा प्रहार संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष  बाळा भोसले, तालुकाध्यक्ष अनिल गांगुर्डे,  बाबासाहेब सुरडकर, दत्तू सपकाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.