बीड - सोलापूरहून औरंगाबादकडे बंद कंटेनर घेऊन जात असलेल्या चालकाने समोर उभ्या भंगारच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भंगार गाडीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे बायपास नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ घडली. यासंदर्भात ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस पुढील तपास करत आहेत.

कंटेनर (क्र. एन.एल.01 ए.सी. 4603) चा चालक आपले कंटेनर घेऊन सोलापूरहून औरंगाबादकडे जात असताना बीड पास केल्यानंतर नामलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलावर एक भंगारचे ट्रक उभे होते. त्या भंगारच्या ट्रकचा चालक फेरोज अली हा गाडीमधील भंगार पडू नये म्हणून वाहन उभे करून वाहनाचा दोरखंड घट्ट करत होता. त्याचवेळी मागून येणार्‍या कंटेनरने जोराची धडक दिली. यात ट्रक चालक जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की, चालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती समजताच मांजरसुंबा ट्रॅफिक पोलिसचे सहायक सहायक फौजदार सुरेश गिते यांनी घटनास्थळी भेट देऊन बीड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली असून पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार सातपुते करत आहेत. यासंदर्भात अपघात घडल्यानंतर कंटेनरचा चालक पळून गेल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांनी दिली.