औरंगाबाद - महापालिकेने आता कचरा संकलन व वर्गीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक प्रभागातून कचरा संकलन व शंभर टक्के कचरा वर्गीकरण करण्याचे टार्गेट पालिका प्रशासनाने कंत्राटदार पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. रेड्डी कंपनी व पालिका अधिकार्‍यांच्या संयुक्‍त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यात कंपनीला शंभर टक्के वर्गीकरणावर अधिक भर देण्याच्या कडक सूचना दिल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर
भोंबे यांनी दिली.

शहरातील कचरा संकलन व वर्गीकरणाच्या नियोजनासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी मंगळवारी दि.29 रोजी रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक मुरली रेड्डी व हर्ष रेड्डी तसेच त्यांचे सर्व प्रभागांचे झोनल, घनकचरा विभागातील स्वच्छता निरीक्षक विशाल खरात आणि सचिन भालेराव, नागरिक मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत कचरा संकलनासंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा करून कंपनीला आदेश देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक प्रभागाअंतर्गत सर्व दवाखान्यांमधील बायोमेडिकल वेस्ट कोणत्याही परिस्थितीत उचलण्यात येणार नाही.

सर्व प्रभागांत कचरा संकलन आणि वर्गीकरण याबाबत टार्गेट देण्यात आले. प्रत्येक वॉर्डातून 100 टक्के वर्गीकरण करून कचरा उचलण्यात यावा. प्रत्येक प्रभागाअंतर्गत आवश्यकतेनुसार घंटा गाड्यांची संख्या वाढवावी. प्रत्येक घंटागाडीवरील सर्व भोंगे व्यवस्थित चालू ठेवणे. सर्व कोवीड सेंटरचा कचरा व्यवस्थित वर्गीकरण करूनच घेण्यात यावा. सर्व रेड्डी कंपनीचे झोनल आणि सुपरवायझर यांनी पालिकेचे प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता जवान यांच्याशी समन्वय साधूनच वॉर्डातील काम कश्या पद्धतीने चांगले करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना कंपनीला करण्यात आल्या.

कचर्‍यात बायोवेस्ट सापडल्यास दंड
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॉस्पीटलचा कचरा रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागअंतर्गत कोणत्याही हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट संकलित केलेल्या कचर्‍यास सापडल्यास त्या प्रभागाचे जवान, झोनल अधिकारी, सुपरवायझर यांना दंड आकारण्यात येईल. तसेच त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. हॉस्पिटलचा बायोमेडिकल वेस्ट सापडल्यास त्वरित प्रमोद जाधव, नागरिक मित्र पथक यांच्याशी संपर्क करून त्यांना दंड करण्यात यावा, असे नियोजन बैठकीत ठरले आहे.

सुक्या कचर्‍याचे स्वतंत्र नियोजन
प्रभागनिहाय वार्डातील वर्गीकरण केलेला फक्त सुका कचरा संकलित करण्याचे स्वतंत्र नियोजन करण्याचे या बैठकीत कंत्राटदारास सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रभाग 1,2 व 3 मधील सुका कचरा सेंट्रल नाका येथे संकलित केला जाईल. तर प्रभाग 4 व 5 येथील कचरा चिकलठाणा प्रक्रिया केंद्रात थेट संकलित केला जाईल. प्रभाग 6 मधील सुका कचरा रामनगर, विठ्ठलनगरात संकलित केला जाईल. तर प्रभाग 7, 8 व 9 मधील सुका कचरा कांचंनवाडी येथे संकलित केला जाईल.

सुमनांजली हॉस्पीटलसह दोघांना दंड
बैठकीत ठरल्याप्रमाणे पालिकेच्या घनकचरा विभागाने रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या हॉस्पीटलविरोधात दंडात्मक कारवाईला सुरूवात देखील केली आहे. पालिकेच्या पथकांनी बुधवारी सिडकोतील सुमनांजली नर्सिंग होमसह दोघा जणांकडून पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल केला. पडेगाव रोड येथे डॉ. नासेर हुसैन यांच्या दवाखान्यातील बायोमेडीकल वेस्ट रस्त्यावर टाकताना आढळून आले. त्यामुळे नागरिक मित्र पथकाने डॉ. हुसैन यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारुन तो वसूल केला. त्याचप्रमाणे सिडको एन-2 येथील सुमनांजली नर्सिंग होमचे बायोमेडीकल मटेरियल रस्त्यावर आढळले. त्यांनाही पाच हजार रुपये इतका दंड आकारुन तो वसूल केल्याची माहिती प्रशासनाने दिली.