औरंगाबाद :  वेगवेगळ्या कारणातून वाद असलेल्या नजीकच्या मित्रानेच मॉन्टी सिंगची चाकुने भोसकून हत्या केल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी मॉन्टी सिंगचा मारेकरी कपिल रापते उर्फ राजे याला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अटक केली. रापते हा राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे.
कपिल रापते उर्फ राजे याला परभणीतून तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो औरंगाबादेत राहत होता. त्याच्यावर मध्यंतरी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात देखील मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. मिटमिटा भागातील पिस होम सोसायटीतील एका अपार्टमेंटमधील तिस-या मजल्यावर 21 ऑक्टोबर रोजी एका राजकीय संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या मंटूश कुमार सिंग अनिल कुमार सिंग (30, मुळ रा. कुंज, ओहारी, ता. नवादा, बिहार) याची निर्घुण हत्या केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून कपिल रापते हा फरार झाला होता. तब्बल सहा दिवसानंतर छावणी आणि गुन्हे शाखा पोलिसांनी रापतेच्या दौंड येथून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी एका तरुणीला देखील छावणी पोलिसांनी हत्येच्या दुस-या दिवशी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच मॉन्टी सिंगच्या मोबाईलमधील संभाषणाचे रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. तेव्हापासून पोलिस रापतेच्या मागावर होते.