औरंगाबाद - महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विनामास्क फिरणा-या तसेच रस्त्यावर थुंकणा-या आणि कचरा टाकणा-या नागरिकांना दंड आकारला जात आहे. मागील 5 महिन्यात पालिकेच्या पथकांनी तब्बल 5 हजार 544 नागरिकांकडून 500 रुपये प्रमाणे 27 लाख 83 हजार 150 रूपयांचा दंड वसूल केला आहे.

महिनाभरापासून पालिकेच्या नागरिक मित्र पथकांकडून ही कारवाई सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात पथक कर्मचारी यांनी बुधवारी (दि.30) रोजी देखील रस्त्यावर थुंकणे यासाठी एकूण 37 नागरिक यांच्याकडून प्रतिव्यक्ती 100 रुपयेप्रमाणे 3 हजार 700 रूपये दंड वसूल केला. तसेच विना मास्क फिरणारे एकूण 146 व्यक्तींकडून 500 रुपये दंडप्रमाणे 73 हजार रुपये आणि रस्त्यावर कचरा टाकणारे एकूण 21 नागरिक यांच्या कडून प्रतिव्यक्ती 150 रुपयेप्रमाणे 3 हजार 150 रुपये तसेच बाबा पेट्रोल पंप येथील परवेझ पटेल या प्लस्टिक सप्लायर यांच्याकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याबद्दल 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शहरातील एन-2 सिडको येथील सुमानंजली नर्सिंग होम आणि सुमानंजली हॉस्पिटल यांच्याकडे बायोवेस्ट मटेरिअल आढळून आल्याबद्दल प्रत्येकी 5 हजार रुपये असे एकूण 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

पडेगाव रोड येथील डॉ. नासिर हुसेन यांच्याकडे बायोवेस्ट मेडिकल कचरा आढळून आल्याबद्दल 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशाप्रकारे एकूण रुपये 1 लाख 5 हजार 850 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दुकानदार यांच्याकडे थर्मल गन आणि पल्स ऑक्सिमिटर याची तपासणी देखील यावेळी करण्यात आली. ही कारवाई याही पुढे अशाच प्रकारे सुरू राहणार आहे.

मास्क लावूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन
नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे. रस्त्यावर थुंकू नये आणि रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आजपर्यंत पालिकेतर्फे शहरात 1 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत विनामास्क कारवाई दरम्यान 5 हजार 544 नागरिकांकडून 500 रुपये प्रमाणे 27 लाख 83 हजार 150 रूपये दंड वसूल केला आहे.