परभणी (महेश गाढे) : दुष्काळात तेरावा महिना, असून अडचण नसून खोळंबा आदी वाक्प्रचार आपण दैनंदिन व्यवहारात पाहात असतो असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील शिधा पत्रिका धारकांना अनुभवयास मिळत आहे. भाकरी खाणार्या मराठमोळ्यांना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून मिळालेल्या मक्याचे नेमके करावे काय हा प्रश्न शहरी भागातील महिलांना पडला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील महिण्यात गहू, तांदळा सोबत शिधा पत्रिका धारकांना मक्याचेही वाटप करण्यात आले. वाटप केलेला मका निकृष्ट दर्जाचा असल्याची ओरड सर्व माध्यमातून सुरू असतानाच वाटप झालेल्या मक्याचे करायचे काय हा यक्षप्रश्न शहरी भागातील महिलांसमोर उपस्थित झाला आहे.  प्रशासनाकडून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून मक्याचे वाटप केल्यामुळे कार्ड धारकांचा मोठा गोंधळ झाल्याचे दिसून येते.आता मराठवाड्यातील मराठमोळ्या नागरिकांना ’मके दी रोटी - सरसो दा साग’ खान्याचे भाग्य प्रशासनामुळे बहाल झाल्याचे सर्वसामान्य शिधा धारकांकडून उपहासात्मक बोलल्या जात आहे.

फिरुन मका परत बाजारात : गरिबांना रेशन दुकानातून मका मिळाल्यामुळे या मक्याचे नेमके करावे काय हा प्रश्न महिलांना पडला आहे.चक्की मालक या मक्याचे दळण करून देण्यासही नकार देत आहेत. परिणामी गल्लीबोळातील छोटे-मोठे दलाल हा मका आठ ते पंधरा रुपये किलो दराने विकत घेत आहे. स्वस्त धान्य दुकानातून मिळालेला हा मका फिरून परत बाजारात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर खरीपाच्या तोंडावर बैलांना ऐरण म्हणून उपयोगी पडेल याकरिता काही शेतकरीही हा मका विकत घेत असल्याचे दिसते.

शासनाच्या धोरणाला हरताळ : गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना दोन वेळचे पुरेसे अन्न अल्प दरामध्ये उपलब्ध व्हावे. काबाडकष्ट करणार्‍या गोरगरिबांची उपासमार होऊ नये या हेतूने या योजनेची सुरुवात झाली. परंतु काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चुकीच्या निर्णयामुळे या संपूर्ण यंत्रणेला खिळ बसत आहे. नागरिकांच्या अन्नातील घटक नसतानाही मका वाटपाचा हा निर्णय चुकीचा व अनावश्यक खर्च वाढवणारा असल्याचे तज्ञांकडून बोलले जात आहे.