लातूर : लातूरकरांसाठी जीवनवाहिनी असलेले मांजरा धरण मागील वर्षाप्रमाणेच यंदाही पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे मांजरा धरणाला भेट देऊन आमदार धिरज देशमुख यांनी शनिवारी मनोभावे जलपूजन केले. आता शेतकर्‍यांची भरभराट होऊ दे, असे साकडेही त्यांनी जलदेवतेकडे घातले.
वरुणराजाच्या कृपेमुळे राज्यातील वेगवेगळी धरणे भरली आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील पिण्याच्या पाण्याचे संकट मिटले आहे. पण, मांजरा धरण केव्हा भरणार? याकडे लातूरकरांचे लक्ष लागले होते. अखेर मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. याचे औचित्य साधून आमदार देशमुख यांनी मांजरा धरणाला भेट दिली. थोर व्यक्तिमत्व, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला प्रारंभी पुष्प अर्पण केले. त्यानंतर धिरज देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

दूरदृष्टीचा पुनःप्रत्यय देणारा क्षण : आमदार देशमुख म्हणाले, आपल्याकडे बर्‍याचदा परतीच्या पावसामुळे मांजरा धरण भरते. हे आपण मागच्या वर्षीही अनुभवले होते. पण, यंदा परतीच्या पावसाआधीच मांजरा धरण 100 टक्के भरत आहे. याबरोबरच मांजरा नदीवरील 15 बराजही जवळपास भरले आहेत. त्यामुळे सर्व लातूरकरांसाठी हा आनंदाचा व अत्यंत समाधानाचा क्षण आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या घटनेतून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीचा पुनःप्रत्यय आपल्या प्रत्येकाला आल्यावाचून राहत नाही. दरम्यान, मांजरा प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या लासरा बराजचीही आमदार देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, सर्जेराव मोरे, रविंद्र काळे, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता आर.के. पाटील, शाखा अभियंता एस.डी. पाटील, सुरेंद्र चव्हाण, शाखा अभियंता पूजा पाटील, प्रवीण पाटील, सुभाष घोडके, अनंतराव देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, रघुनाथ शिंदे, एस.पी. जावळी, शाखा अभियंता शाहूराज पाटील, शाखा अभियंता एस.डी. बडे, अर्जून जाधव, आशिष चव्हाण, पंडित आव्हाड, विकास ठोंबरे, अण्णा साबळे आदी उपस्थित होते.

सर्वांना समान पाणी मिळावे : लातूरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी मांजरा धरण हे अत्यंत महत्वाचे धरण आहे. सलग 2 वर्षे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. असे असले तरी पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करण्याचा, पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संकल्प करायला हवा. पाण्याची बचत या विचाराला जीवनशैलीचा एक भाग बनवूया. या कार्यात जलसंपदा विभागाने लोकसहभाग वाढवून पाणी बचतीचा मांजरा पॅटर्न तयार करावा, सर्वांना समान पाणी मिळावे, यासाठी लोकांना सोबत घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही आमदार देशमुख यांनी दिल्या.