परळी वैजनाथ : परळीत शनिवारी रात्री झालेल्या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गुंडांनी शनिवारी रात्री जुन्या गाव भागात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली, यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये काही ऑटो रिक्षांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यात 12 जणांनी गाड्या फोडल्याची माहिती पोलिसांना दिली.
शनिवारी मध्यरात्री गुंडांनी धुमाकूळ घालत जुन्या गाव भागातील चारचाकी, तीन चाकी गाड्या, रिक्षा यांना लक्ष करत त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. खंडोबानगर, सावतामाळी परिसर, तुळजाईनगर, कृष्णा नगर, गणेशपार, अंबेवेस आदी भागात घरासमोर लावलेल्या गाड्यांची दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी रिक्षा, कार आदी वाहनांची नासधूस केली. यात सर्व गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. धक्कादायक म्हणजे त्यांना अडवणार्‍या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले.
अगोदरच कोरोनामुळे रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यात असे संकट कोसळून त्यांचे यात नुकसान झाले आहे. या गुंडांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व घटनेत नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसान झालेल्या वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे, मात्र ही यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने याचाच फायदा या गुंडांनी उचलला असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने परळी शहरात गुन्हेगारीच्या घटना लवकर उघडकीस येत नाहीत. तसेच पोलीस यंत्रणेलाही तपास करणे अवघड जात आहे. परळी शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. परळीतील सीसीटीव्ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली होती. परंतु अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली नाही.