बदनापूर - आशा डे निमित्ताने तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आशा डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बदनापूर येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके, गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन कुंडकर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुदेश वाठोरे, तालुका समुह संघटक सीमा देवरे आदी  उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके यांनी केले. सूत्रसंचालन सुदेश वाठोरे यांनी केले. डॉ. योगेश सोळंके म्हणाले, की आशा यांनी कोविड, कोरोना मध्ये व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये केलेले काम  अभिनंदनीय आहे.  गावपातळीवर आशा यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान, आरोग्य विषयक प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांत तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा व गट प्रवर्तक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन आशा यांचा सत्कार करण्यात येऊन प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले. आभार प्रदर्शन तालुका समुह संघटक सीमा देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदेश वाठोरे, रवी खरात, प्रदीप पिसे, सीमा देवरे, ज्योती चव्हाण यांनी प्रयत्न केले.