सिल्‍लोड : किरकोळ वादावरून थांबलेल्या मार्गावर एका क्रुझर गाडीने नऊ जणांना उडविले. त्यात तिन जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी मध्यरात्री सिल्लोड-भराडी रोडवर वाडी फाटा येथे घडला. या दुर्दैवी घटनेत शेख नईम मजिद (35) रा. कोतवालवाडा सिल्‍लोड, शेख हमीद शेख अमीन (25) कोतवालवाडा सिल्लोड, गुलामनबी गणी खान पठाण (35) रा. मोढा खुर्द, हे तिघे ठार झाले. तर अफजल खान मजीद खान (40) रा. ईदगाह नगर सिल्लोड, सोहेल खान इस्माईल खान (25) रा. शिवना, उजेफ खा नूर खा रा. वांगी, समीर खा आसिफ खा रा. वांगी, लक्ष्मण सखाराम कल्याणकर (45) रा. मोढा खुर्द, शेख फय्याज अजीज (35) रा. बिडकीन हे सहा जण जखमी झाले आहेत. 
अधिक माहिती अशी की, गुलामन बी गणी खान पठाण, उजेफ खा नूर खा, समीर खा आसिफ, लक्ष्मण सखाराम कल्याणकर, शेख फयाज अजीज हे पाच जण सिल्लोड येथून मोढाकडे दोन मोटारसायकल जात असताना भराडी रोडवरील वाडी फाटा येथे दोन्ही मोटारसायकल स्वारांमध्ये वाद होऊन हे पाचही जण रस्त्यावर वाद करीत उभे राहिले. तेव्हा रेलगाव येथून मका भरून घेऊन येत असलेली ट्रक क्र. एमएच 20 इ. जी. 0932 या ट्रक मधे बसलेले शेख नईम मजिद, शेख हमीद शेख अमीन, सोहेल खान इस्माईल खान, अफजल खान मजीद खान यांनी ट्रक थांबवून मोटारसायकल स्वारांच्या मध्ये होत असलेला वाद थांबविण्यासाठी खाली उतरले. मात्र, हे सर्व सुरू असताना सिल्लोड येथून एक अज्ञात क्रूझरने गाडी न थांबवता थेट रस्त्यावर वाद करीत उभ्या असलेल्या नऊ जणांना चिरडत नेले. यात तिघे ठार झाले. तर सहा जण गंभीर झाले. अपघात होताच क्रूझर चालक गाडी घेऊन पसार झाला असून अपघातास कारणीभूत असलेल्या या वाहनाचा शोध सिल्लोड शहर पोलीस घेत आहेज. सदरील अपघाताची नोंद सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे हे करीत आहेत.

वाद सोडविण्यास गेलेल्या मजुरांचा मृत्यू : या अपघातात केवळ रस्त्यावरील होत असलेल्या वाद सोडविण्यासाठी गेलेल्या शेख नईम, शेख हमीद या दोघा मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर वादात सहभागी असलेल्या गुलामन बी यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या शेख नईम यांच्या पश्‍चात पत्नी तीन मुले, एक मुलगी, आई, वडील, सहा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. तर शेख हमीद यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, सहा भाऊ असा परिवार तर गुलामनबी यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

जखमींवर उपचार सुरू : सदरील अपघात होताच जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिकच्या उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले. यात शेख हमीद शेख अमीन याचा जागीच मृत्यू झाला होता. तर शेख नईम मजिद याचा औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. तर गुलामन बी गणी खान यांचा औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन जणांवर सिल्लोड येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेचव दोन जणांचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असून एकावर उपचार करून घरी पाठविले आहे.

चोर समजून गाडी अंगावर घातल्याचा संशय : सदर अपघात घडला तेंव्हा वरील सर्व नऊ जण रस्त्यावर उभे होते. त्यात रात्र असल्याने अज्ञात वाहन चालकास हे दरोडेखोर किंवा चोर असल्याचा संशय आल्याने त्याने गाडी थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या इसमांच्या अंगावर गाडी घातली असावी. असा संशय पोलिसांना असून त्या वाहनांचा तपास लागल्यानंतरच खरी परिस्थिती समोर येणार आहे.