पाचोड : भिंतीवरून उडीमारुन घराच्या छतावर प्रवेश करुन जिन्यातील बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक तोळ्याचे सोन्यासह 30 हजारे रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बुधवारी पैठण तालुक्यातील मुरमा येथे घडली.
अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातिल मुरमा येथील रामनाथ मापारी हे आपल्या कुटूंबासह नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या शेतात गेले. ते दिवसभर शेतात काम आटोपून सायंकाळी 5 वाजता घरी परत आले असता त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. आत बघितले असता त्यांच्या घरातील खोल्यांमधील कपाट उघडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील विश्‍वनाथ मगरे यांना कळविले. यावरून बीट जमादार किशोर शिंदे, फेरोज बर्डे यांनी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी मापारी यांच्या तक्रारीवरुन पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.