शिऊर : वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या तलवाडा ग्रामपंचायतच्या सर्व नऊ जागा बिनविरोध निवड करण्यात आल्या आहेत. गटतट बाजुला ठेवुन गावकर्‍यांनी विकासाची कास धरत बैठक घेऊन सर्व समाजाला प्रतिनिधित्व देत सामाजिक सलोखा राखत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

तलवाडा गावात विविध वॉर्डात अनेकजण इच्छुक होते. इच्छुकमधून उमेदवार निवडण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक यांची कोरकमिटी तयार करण्यात आली. या कोरकमिटीने योग्य उमेदवार निवड केली. सर्व समावेशक निकष लावून सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले. तलवाडा गावात मराठा, बौद्ध, मुस्लिम, धनगर आदी जातीचे नागरीक आहेत. पुर्वीच्या काळी राजे महाराजे यांचे शासन योग्य चालावे यासाठी ॠषी मंडळ असायचे त्याप्रमाणे पंचकमिटीने काम पाहीले. अनेक गावात आजही पोळा सणाच्या मानावरून वाद निर्माण होत असतात. पण तलवाडा गावात चिठ्ठी काढुन या सनाचा मान बदलुन बदलुन सर्व नागरिकांना दिला जातो. पोळयाचा मान ज्या शेतकर्‍याची चिठ्ठी निघेल त्या शेतकरयाला देऊन शाल, श्रीफळ, देऊन सत्कार केला जातो. तिच परंपरा कायम राखत ग्रामपंचायत निवडणुक सामोपचाराने घेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात मोलाचे सहकार्य व पुढाकार सर्व समाजाचा व तरूण वर्गाचा आहे. याच गावात भागीनाथ मगर यांच्या रूपाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भगीरथ मगर, तर राजेंद्र मगर यांच्या रूपाने पंचायत समिती उपसभापतीपद सध्या आहे. दिग्गजांच्या गावात ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्याने गावाचे वर्चस्व तालुक्यात सिद्ध झाले आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभापती भागिनाथ मगर, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र मगर, सरपंच भाऊसाहेब मगर, चेअरमन विनोद मगर, आमोल मगर, जयराम मगर, शिवाजी मगर, पुरुषोत्तम महाराज, किशोर मगर, दादाभाऊ मगर, जनार्दन मगर, आदिसह गावातील जेष्ठ मंडळी तरुण वर्ग यांनी प्रयत्न केले.

यांची झाली बिनविरोध निवड
पुनम ज्ञानेश्वर मगर, सुवर्णा वसंत मगर, रंजना दत्तू मगर, जपान यशवंत सोनवणे, सुनीता दादासाहेब मगर,  शांताराम भागीनाथ मगर, सीमा राजेंद्र पवार, गयाबाई रामभाऊ मगर, शेख वाहिद इलाही यांची बिनविरोध निवड झाली आहे.