फुलंब्री :  तालुक्यातील बोरगाव अर्ज ते पेंडगाव रस्त्याचे काम अर्धवट, निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार काँग्रेसचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष बाबुराव डकले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच या रस्त्याचे काम येत्या 15 ऑगस्टपर्यंत न झाल्यास मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ही देण्यात त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज ते पेंडगाव रस्ता दोन वर्षापूर्वी म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणूकी आधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 57 लक्ष रुपये खर्च करून व त्या रस्त्याचे जास्तीचे बिल देऊन काम अर्धवट करण्यात आले आहे. या रस्त्याचे उद्घाटन तत्कालीन विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा रस्ता आतापर्यंत अर्धवट असून या रस्त्याने शाळकरी मुलांना व शेतकरी यांना नीट चालताही येत नाही. संबंधित ठेकेदार हा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मर्जीतील असून त्याला अधिकारी वर्गाचाही आशीर्वाद आहे. 
हा रस्ता 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण न झाल्यास पेंडगाव व परिसरातील नागरिकांच्यावतीने मुंबईतील मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.