पैठण (मुफीद पठाण) : राज्यात केबीसी घोटाळ्या प्रमाणेच तालुक्यातील बिडकीन डीएमआयसी परिसरात तीस-तीस योजनेचा अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी तसेच गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा तीन महिन्यात चारपट अधिक रक्कम देण्याचे अमिष देत अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. तीन महिने ऐवजी सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटले तरीही पैसे मिळत नसल्यामुळे शेकडो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. या योजनेचा मास्टमाइंड राठोड नावाचा मुख्य सूत्रधार परराज्यात फरार झाला असून तीस-तीस योजनेची सर्व सूत्रे परराज्यात बसून हलवीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सर्वप्रथम दै. आदर्श गावकरीने वाचा फोडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मास्टरमाइंड राठोडचे अत्यंत जवळचे नातेवाईक हे तालुक्यातील वजनदार राजकीय व्यक्ती असल्याने त्याला राजाश्रय मिळत असल्याचे कळते. तीस-तीस योजनेत अनेकांना फसवून फरार झालेल्या मुख्य सूत्रधाराला राजकीय वरदहस्त असल्याने फसवणूक झालेले शेतकर्‍यांची मात्र घर का ,ना घाट का ,अशी अवस्था झाल्याने जमीन जुमला व पैसा अडका गेल्याने गुंतवणूक केलेल्या शेकडो शेतकरी रस्त्यावर येणार आहे.शेतीचा मोबदलाच नाही तर अनेकांनी घर-दार गहाण ठेवून पैसे गुंतवणूक केले आहेत. जेव्हा हे पूर्णपणे एक्स्पोज होईल तेव्हा आकडा केबीसी पेक्षा मोठा असण्याचह शक्यता आहे. 
या योजनेत एकाएका शेतकर्‍याने एक-एक, दोन-दोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा सगळा व्यवहार विश्वासावर व तोंडी झाला असून या व्यवहाराचा कुठलाही पुरावा नसल्याने शेतकरी पोलिसात तक्रार करण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे योजनेत गुंतवणूक केलेले पैसे परत करा, म्हणून नागरिकांच्या सततच्या तगाद्याने अंडरग्राउंड झालेले मध्यस्थ हे लवकरच मुख्य सुत्रधाराच्या भेटीसाठी जाणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती हाती आली आहे. दैनिक आदर्श गावकरीने शुक्रवार दि.11 फेब्रुवारी, 21 व 17 सप्टेंबर च्या अंकात तीस -तीस योजने संदर्भात सर्वप्रथम वाचा फोडल्याने गुंतवणूकदारासह यात सहभागी दलालांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डीएमआयसी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांचा तीस -तीस योजनेत सर्वात जास्त सहभाग आहे. रातोरात श्रीमंत होण्याच्या आमिषाने बिडकीन, निलजगाव, घारदोन गाडीवाट, कचनेर, देवगड तांडा, पोरगाव, पाडळी, बोकुड जळगाव, जांभळी, डोणगाव, कापुसवाडी, वरंवडी, चिंचोली, गेवराई तांडा, गिरनेरा तांडा परिसरातील जवळपास 400 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी या योजनेत मोठी रक्कम गुंतवणूक केली आहे. यात सर्वात जास्त बंजारा समाजाचे शेतकरी असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या आमिषाला बळी पडून अनेक शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपये गुंतवणूक केली असल्याने हा आकडा अब्जावधीच्या घरात असल्याची चर्चा गुंतवणूकदारात सुरू आहे. 
दरम्यान, सर्वप्रथम ज्या शेतकर्‍यांना यात गुंतवणूक केली त्यांना काही दिवसात व्याजासह परतवा मिळाल्याने अनेक शेतकरी या योजनेकडे आकर्षित झाले. भाबड्या शेतकर्‍यांचा विश्‍वास बसल्याने अनेक शेतकरी यात सामिल झाले. मात्र,  गेल्या सहा महिन्यापासून व्याज तर सोडा मुद्दल रक्कम मिळत नसल्याने तसेच ज्या दलालाच्या भरवशावर योजनेत रकमेची गुंतवणूक केली त्या तथाकथित दलालांचा संपर्क होत नसल्याने गुंतवणूकदार पुरते हवालदिल झाल्याने 
दररोज मध्यस्थ व गुंतवणूकदार यांच्या वादविवाद होऊन बाचाबाची होत आहे. मात्र योजनेत पैशाची गुंतवणूक केल्याचा कुठलाही सबळ पुरावा नसल्याने नागरिक पोलिसांकडे दाद मागण्यास जात नसल्याचे बोलले जात आहे.

मास्टमाइंडकडे आलिशान गाड्यांचा ताफा : तीस- तीस योजनेचा मास्टरमाइंड प्रमुख सूत्रधाराकडे जवळपास 35-40 आलिशान गाड्याचा ताफा असल्याचे बोलले जात आहे. यात मर्सिडीज, ऑडी, फर्चूनर, स्विफ्ट डिझायर, क्रेटा, इर्टिगा वाहनांचा समावेश आहे. तसेच या योजनेच्या नावाप्रमाणेच या सर्व वाहनाचे क्रमांक 3030 असल्याची माहिती समोर आली आहे. या क्रमांकाच्या रोड शो करणार्‍या गाड्या मात्र आदर्श गावकरीच्या वृत्तानंतर बिडकीनच्या रस्त्यावरून तसेच परिसरातून गायब झाल्या आहेत.

गुप्तचर संस्थेकडून तपास करण्याची मागणी : बिडकीन गाव हे संवेदनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीस -तीस योजनेच्या नावाखाली अनेक शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्याने वादविवादाच्या घटना लक्षात घेता अनुचित प्रकार होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गुतचर संस्थेमार्फत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.