लातूर - क्रिडा विभागामार्फत ओपन जीम अनेक ठिकाणी सुरु आहेत. या जीमचा फायदा नागरिकांना चांगल्या प्रकारे होत आहे. तरी लातूर जिल्हयातील सर्व 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात ओपन जीम सुरु करण्याठी क्रीडा विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. तसेच उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सर्व मंजूर असलेली व प्रलंबित राहिलेली कामे अधिक गतीने मार्गी लावातीत, असे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हयातील व उदगीर विधानसभा मतदार संघातील प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, उदगीर न.प. चे मुख्याधिकारी भारत राठोड, उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कांडलेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील यांच्या सह संबंधित जिल्हा व उदगीर-जळकोट तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, ओपन जीमचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. प्रत्येक शहरात किमान 10 तर 5 हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात किमान एक ओपन जीम निर्माण करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व तरुणांना याचा लाभ मिळेल. त्याप्रमाणेच उदगीर येथे सर्व सोयी- सुविधा युक्त क्रीडा संकुल उभारणीचा बृहत आराखडा तात्काळ सादर करावा. या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, रनिंग ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंडसह इतर सर्व क्रिडा विषयक सुविधा प्रस्तावित कराव्यात असे त्यांनी निर्देशित केले. तसेच उदगीर क्रीडा संकुलाची जी जागा आहे त्यास सर्व बाजूंनी कंपाऊंड वॉलचे काम तात्काळ सुरु करावे. जो 86 लाखाचा प्रस्ताव केला आहे त्यासाठी निधी कमतरता असेल तर आमदार फंडातून निधी उपलब्ध केला जाईल, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने उदगीर येथे सर्व शासकीय कार्यालयांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास पुढील 15 दिवसात तांत्रीक मान्यता घ्यावी. ही इमारत भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करुन अत्यंत प्रशस्त तयार केली पाहीजे असे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगून यासाठी 25 कोटीचा निधी मंजूरी लवकरच मिळेल असे त्यांनी म्हटले. तर उदगीर येथील ट्रॉमा केअर इमारत तांत्रीक मान्यता आली असून उर्वरित सर्व कामे त्वरित मार्गी लावातेत, असे त्यांनी सूचित करुन आरोग्य विभागाने यासाठी मंजूर पदांचा आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.उदगीर शहरात उमा चौकात ट्रॅफिक जॅम मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे त्याठिकाणी उड्डाणपुलाचा प्रस्ताव त्वरित सादर करावेत. मार्केट यार्ड ते, एम.जी. रस्ता, व मलकापूर उड्डाणपूलचे प्रस्ताव वेळेवर सादर करुन कामे तातडीने मार्गी लावावेत. ज्या ठिकाणी अडचणी येत असतील त्याची माहिती तात्काळ दयावी, असे श्री. बनसोडे यांनी सूचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी ही मार्गदर्शन केले. तसेच दिलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करुन प्रलंबित कामे मार्गी लावली जातील, असे सांगितले. यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी लातूर जिल्हा विशेषत:उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे व पायाभुत सोयी-सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. व दिलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित यंत्रणेने दक्षता पूर्वक कामे पार पाडावीत, असे ही त्यांनी सांगितले.