जालना - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीमध्ये आज दि. 27 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व सुक्ष्म निरीक्षक यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुक प्रक्रीया भयमुक्त व शांततामय मार्गाने होण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकार्‍याने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी यावेळी दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) रवींद्र परळीकर यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व सुक्ष्म निरीक्षक यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिनचा वापर न करता मतदान हे बॅलेटपेपरवर घेण्यात येणार असल्याने निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रक्रिया नीटपणे समजुन घेण्याबरोबरच दक्षपणे काम करावे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 35 उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार मोठा आहे. मतपत्रिकेची व्यवस्थित घडी होऊन मतपत्रिका फाटणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. एका मतपेटीमध्ये 300 मतपत्रिका बसु शकतात.

300 पेक्षा अधिक मतदान असणार्‍या मतदान केंद्रावर एकापेक्षा अधिक मतपेट्यांचा वापर करावा लागणार असल्याने प्रत्येक मतपेटीवर क्रमांक नोंदविण्यात यावेत. फॉर्म क्रमांक 16 मध्ये मतपत्रिकांचा हिशोब लिहिण्यात येत असल्याने हा फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा. फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची चुक होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. मतदारांना मतदान करताना निवडणूक आयोगाकडुन देण्यात आलेल्या जांभळया शाईच्या पेनानेच पंसती क्रमांक नोंदविणे बंधनकारक असल्याने ते त्याच पेनने नोंदविले जाईल, याची दक्षता घेण्याबरोबरच निवडणुकीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य तपासुन घेण्यात यावे. दिव्यांग व 80 वर्षावरील मतदारांचे मतदार हे मतदानासाठी आल्यास प्राधान्याने त्यांचे मतदान करुन घेण्यात यावे. मतदानासह इतर अहवाल वेळेत पोहोचतील याचीही, सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी नोंद घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केल्या.

मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये असेल तरच त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार असुन मतदाराकडे मतदान ओळखपत्र नसेल तर निवडणुक आयोगाकडून मान्यता देण्यात आलेले नऊ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात यावेत. त्याचबरोबर मतदान करतेवेळी छायाचित्र, व्हिडीओ काढणे व ते समाजमाध्यमांवर व्हायलर करणे असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेऊन मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याचीही सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केल्या. निवडणुकीदरम्यान सुक्ष्म निरीक्षक म्हणून केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येते.

निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी तसेच मतदान केंद्रावरील घडामोडीचे सुक्ष्म निरीक्षण व्हावे यादृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या सुक्षम निरीक्षकांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिल्या. यावेळी क्षेत्रीय अधिकार्‍यांना बॅलेटबॉक्स संदर्भात मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मतपेटी सीलबंद करण्याबाबत व्हिडीओही उपस्थितांना दाखविण्यात आले.सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रवींद्र परळीकर यांनीही उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर अशी माहिती दिली.