पैठण - तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैठण शहराजवळील नाथमंदिरा पाठिमागील गोदावरी काठावर असलेल्या जुने कावसन या गावात शनिवारी मध्यरात्री एकाच कुटुंबातील तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

मृतांमध्ये पती, पत्नी एका लहान मुलीचा समावेश आहे. तर एक लहान मुलगा जखमी झाला आहे. संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (वय ३५), त्यांची पत्नी आश्विनी (वय ३०)व मुलगी सायली( वय १०), अशी मृतांची नावे आहेत. तर राजूचा मुलगा सोहम ( वय ६) हा जखमी असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, अशी माहिती पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांनी दिली. दुपारी एकच्या सुमारास मृतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून मृतदेह , नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पैठण पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळी तपास केल्यानंतर प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे कुठलेही धागेदोरे सापडले नाहीत. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडवण्यात आले असावेत का? या बाजूने तपास केला जात आहे, असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.