कंधार (नितीन मोरे) : येथील शिवा मामडे यांनी आपल्या व्यवसायाची  जबाबदारी  सांभाळत मन्याड खोर्यातील पारंपारिक शेतीला बगल देत  केसर आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आंब्याचे चांगले व्यवस्थापन करण्याबरोबर फळपिकांवर लक्ष केंद्रित करून आवळा, लिंबू  द्राक्षे, केळी आदींची जोड देत अर्थकारण बळकट केले आहे.  
नांदेड- बिदर  महामार्गावर  कंधार शहराच्या  अलीकडे पाच-सात  किलोमीटवर संगुचीवाडी (ता. कंधार ) गाव येथे शिवा मामडे यांची 6 एकर शेती आहे. वास्तविक हा भाग निम्न मानार धरणाच्या पाण्याने व्यापलेला आहे. सर्वत्र कालवे फिरल्यामुळे पाण्याची चणचण फारशी भासत नाही. सभोवताली उसाचे मळेच मळे पाहायला मिळतात. पण उसाचा वाढता उत्पादन खर्च, उत्पन्न मिळण्यासाठी लागणारा कालावधी हे मुद्दे पाहत मामडे यांनी फळकेंद्रित शेतीची वाट धरली आहे.

असे आहे आंब्यातील व्यवस्थापन : आंब्यासाठी सुमारे 6 एकर क्षेत्र ठेवले आहे. मध्यम व भारी जमिनीची निवड करून 15 बाय पाच फूट अंतरावर जुन 2018 मध्ये लागवड केली आहे.  6 एकरमध्ये  सुमारे 2300 झाडे आहेत. रासायनिक व सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीने निविष्ठांचा वापर होतो. लागवडीवेळी प्रतिझाड 200  ग्रॅम निंबोळी पेंड व त्यानंतर ठिबक उभारून घेतले. आठ दिवसांनी ह्युमिक सिडचा वापर केला आहे. 19-19-19, कॅल्शिअम, बोरॉन आदी खतांसोबत जिवामृताचा वापर प्रामुख्याने करतात. शेणासाठी एक देशी गायी आहे. साधारण 10 दिवसात 20 किलो शेण त्यांना लागते. गरजेनुसार शेण व गोमूत्र बाहेरून देखील आणले जाते. लागवडीनंतर साधारण अडीच वर्षांनी   पहिला बहार धरला. फांद्या, शेंडे यांची छाटणी करण्यात आली. नोव्हेंबरला मोहोर येण्यास सुरुवात होते. दरम्यान, बंद केलेले पाणी पुन्हा सुरू केले जाते. त्यानंतर प्रत्येक आठवड्याचे नियोजन करून वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर  होतो. मामडे यांची बाग तीन वर्षांपूर्वी लागवड केलेली आहे. जुन्या आणि नव्या फांद्यांसह टप्प्याटप्प्याने चार वेळा मोहोर येतो. त्यामुळे बाग टप्प्याटप्याने हंगामात येते. त्याचा विक्री साठी फायदा होतो. जीवामृत हा घटक महत्वाचा असतो. शिवाय बहर अंतिम टप्प्यात असताना देशी गाईच्या दह्याची फवारणी घेतली जाते. अखेरच्या महिन्यात रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय व्यवस्थापनावर भर दिल्याने फळाची गुणवत्ता व चमक चांगली मिळते असा असा मामडे यांचा अनुभव आहे.

सराफा व्यवसाय सांभाळून शेती : दहावीचे शिक्षण झाल्यापासून शिवा मामडे व्यवसायातच आहे. कंधार येथे त्यांचे सराफा दुकान आहे. आपला व्यवसाय सांभाळून आपली शेतीही ते करतात. माळीनगर येथील केशर आंबा नर्सरीचे विनय वागधरे यांच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनातून मामडे केशर आंब्याकडे वळले. त्यांच्याच सल्ल्यानुसार ते आंब्याचे व्यवस्थापन करतात.

आश्वासक उत्पादन : लागवडीनंतर तीन वर्षांनी बाग उत्पादनक्षम झाली. पहिल्या वर्षी एकूण क्षेत्रातून सुमारे साडेपाच टनहून उत्पादन मिळेल अशी अपेक्षा मामडे यांनी व्यक्त केली आहे. आंबा हा व्यापार्याला न देता ते स्वत विक्री करणार असल्याचे सांगत आहेत.