बदनापूर : सोमठाणा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटून दहा दिवस झाले तरी नगर पंचायतने पाईपलाईन दुरुस्ती न केल्यामुळे बदनापूर येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर पंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे बदनापूरवासियांना मात्र ऐन पावसाळयातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. प्रशासक व वरिष्ठ मात्र कानाडोळा करत असल्यामुळे अजून दहा ते पंधरा दिवस नळांना पाणी येण्याची शक्यता नाही. सध्या नागरिकांना खासगी टँकरधारकांकडून विकत पाणी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
बदनापूर येथील नगर पंचायत सध्या प्रशासक डॉ.संदीपान सानप यांच्या नियंत्रणाखाली असतानाही येथील अधिकारी - कर्मचारी कागदी घोडे नाचवून वेळ काढूपणा करण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. बदनापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पाजवळ विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. बदनापूर शहरापासून सोमठाणा धरणाजवळ असलेल्या विहीरीचे अंतर जवळपास 10 किलो मीटर आहे. त्याचप्रमाणे सदरील नळयोजनेची पाईपलाईन ही जवळपास 30 वर्षे जुनी आहे. 30 वर्षांपूवी शहराची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन केलेली पाईपलाईन आता अतिशय अपुरी व जीर्ण असताना नगरपंचायतने ती बदलण्याची किंवा त्यात वाढ करण्याची तसदी न घेता याच जिर्ण पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरूच ठेवलेला आहे. त्यामुळे बदनापूर शहरात 20 ते 25 दिवसांनंतर पिण्याचे पाणी येते. ढिसाळ नियोजनामुळे काही वॉर्डात तर महिनोमहिने पाणीच येत नाही त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी कायम वणवण भटकावे लागत असते. श्रीमंत ग्रामस्थ हे जारचे पाणी विकत घेतात. मात्र, गरीब जनता पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येते.

दरम्यान, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बदनापूर ते सोमठाणा असलेल्या या पाईपलाईनला सोमठाणा रस्त्यालगत असलेल्या चारीजवळ गळती लागलेली असल्यामुळे सदरील पाईपलाईनद्वारे पाण्याचा पुरवठाच होत नाही. सोमठाणा रस्त्याच्या कडेने ही पाईपलाईन आलेली आहे. दरम्यान या ठिकाणी चारी बनवण्यात आलेली असल्यामुळे या चारीत पावसाळ्याचे पाणी शेतकर्‍यांनी सोडलेले आहे. चारीत पाणी असल्यामुळे फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीही करता येत नसल्याचे सांगण्यात येते  त्यामुळे मागील 15 दिवसांपासून बदनापूरवासियांना पाण्याचा पुरवठा होऊ शकलेला नाही. पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी या ठिकाणी जेसीबी नेऊन खडडा करून पाईपलाईन दुरुस्तीचा प्रयत्न केला असता या खडडयात पावसामुळे असलेल्या पाण्याचा उपसा न झाल्यामुळे दुरुस्ती होऊ शकलेली नाही. नगर पंचायतचे कर्मचारी चारीला वाहत जाणार्‍या पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पहात असतानाच सोमवारपासून हवामान खात्याने पुन्हा पावसाचा जोरदार अंदाज वर्तवलेल्या असल्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता बदनापूर वासियांना पुढील पंधरा ते वीस दिवस पाणी न येण्याची शक्यता आहे.
बदनापूर शहरात मागील पंधरा दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्याने नागरिकांचे आतोनात हाल होत असून खासगी टँकर धारकांकडून विकत पाणी घ्यावे लागत आहे. परंतु नगर पंचायत अधिकारी मूग गिळून गप्प बसलेले असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरत आहे. नगर पंचायतच्या प्रशासक व मुख्याधिकार्‍यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

बदनापूर शहराला पाणी पुरवठा करणारी नळयोजना 30 वर्षांपूर्वीची असून कालबाह्य ठरलेली आहे. तीस वर्षांपूर्वीची लोकसंख्या व सध्याची लोकसंख्या पाहता नवीन योजना अमलात येणे आवश्यक असतांना मागील पाच वर्षात नगर पंचायत पाणी पुरवठा विभागाच्या पदाधिकार्‍यांनी केवळ कागदोपत्री पाईपलाईन दुरुस्ती करून देयके उचलण्याचे काम केलेले आहे.  परंतु नवीन पाईपलाईन करण्याची कोणतीच तरतूद केली नाही. मागील पंधरा दिवसापासून शहरात पाणी पुरवठा झालेला नसल्याने नागरिकांचे हाल होत असून तातडीने पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
-राजेंद्र जर्‍हाड,  शिवसेना शहरप्रमुख. 

मागील काही दिवसापूर्वी मुख्य पाईप लाईन फुटल्याने शहराला नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा होऊ शकला नाही. सदर पाइपलाईन दुरुस्त करण्याचा नगर पंचायत कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, सदर पाईप लाईन चारी मधून असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पाणी उपसा झाल्याशिवाय पाईप लाईन जोडता येत नाही. तरी आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरच पाईप लाईन दुरुस्त करून शहराला सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल.
-गणेश ठुबे,अभियंता, नगर पंचायत.