दुधड : करमाड लाडसावंगी रस्त्यावर लाहुकी नदिवर असलेल्या अरूंद पुलाला कठडे नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे. अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
करमाड ते लाडसावंगी या मुख्य रस्त्यावरील लाहुकी नदीच्या पुलावर पडलेले मोठमोठे खड्डे व गायब झालेल्या लोखंडी कठड्यामुळे या ठिकाणाहून रात्री अपरात्री प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.  यंदा दुधड परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डयात पाणी तुबलेले असल्याने दुचाकी, चारचाकी चालकांना खड्यांचा अंदाजही येत नाही. तसेच लाहुकी धरण  पूर्ण क्षमतेने भरले असून लाहुकी नदी दुथडी भरून वाहत आहे. आणि याच नदीवरील पुलाचे कठडे गेल्या कित्येक वर्षांपासून गायब झाले आहेत. मात्र, तरी देखील संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या कठडे नसलेल्या अरूंद पुलाने एखाद्याचा जीव घेतल्यानंतर जाग येईल का. असा प्रश्न वाहन चालकांसह नागरिकांनी विचारला आहे. या रस्त्याने भांबर्डा, दुधड, मुरुमखेडा, पिंपळखुटा, लाडसावंगी, शेलुद चारठा, लामकाना, भाकरवाडी, औरंगपुर, सय्यदपुर यासह अनेक अनेक गावातील नागरिकांना शेंद्रा एमआयडीसी, करमाड डीएमआयसी मध्ये कामासाठी रोजच जावे लागते. तसेच परिसरातील व्यापार्‍यांना करमाड हे मुख्य बाजारपेठ असल्याने जावे लागते. व्यापारी वर्गाना धंद्यासाठी हा प्रमुख रस्ता असल्याने लाहुकी नदिचा पुलावरुन कठडे नसल्याने जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री ये-जा करावे लागत आहे. या पुलाची खोली फार जास्त असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अरुंद पुलामुळे कठडे नसल्याने पुलावरून खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे संबधीत विभाग डोळेझाक करुन दुर्लक्ष करत आहे. तरी लवकरात लवकर या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात यावे. अशी मागणी नागरिकांसह वाहनधारक करीत आहेत.