गेवराई - तालुक्यातील मालेगाव येथील एका शेतकर्‍याची हरभरा बियाणात फसवणुक झाली असून एक एकर क्षेत्रांत पेरुमध्ये अंतर पिक म्हणून अमर सिड्स या कंपनीचे काबुली अमर डॉलर या हरभरा बियाण्याची पेरणी केली होती. मात्र महिना उलटला तरी बियाणाची उगवण झाली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकर्‍याने कृषी दुकानदार व कृषी कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेवराई पंचायत समिती व कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. 

शेतकर्‍याने बियाणे कंपनीकडुन शेतकर्‍याची फसवणूक ही काही नवीन बाब नाही परंतु दुकानदाराकडे बोगस बियाणे येते कुठून हे मात्र कोणालाच समजु शकले नाही. खरीप पेरणी वेळेसही सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे बर्‍याच ठिकाणी निष्पन्न झाले होते. आता रब्बीच्या पेरणी वेळेसही काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बियाणे आढळून आले आहे.

तालुक्यातील मालेगाव बु. येथील शेतकरी बप्पासाहेब जगन्नाथ गंगाधर यांनी आपल्या गट नंबर 202 मधील एक एकर क्षेत्रांत पेरुमध्ये अंतर पिक म्हणून अमर सिड्स या कंपनीचे काबुली अमर डॉलर या हरभरा बियाण्याची पेरणी केली होती. मात्र महिना उलटला तरी सदर हरभरा उगवला नसल्याने शेतकर्‍याचे अंदाजे सात ते आठ क्विंटलचे नुकसान झाले आहे. सदरील बियाणे हे बोधेगाव येथील श्री साई अग्रो एजन्सी येथुन खरेदी केले असल्याचे शेतकरी गंगाधर यांनी सांगितले आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे सांगत शेतकरी बप्पासाहेब गंगाधर यांनी न्यायाची मागणी करत संबंधित कृषी दुकानदार व संबंधित बियाणे कंपनी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व मला माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती गेवराई येथील अधिकार्‍यांकडे केली आहे. मात्र या शेतकर्‍याला आता नुकसान भरपाई मिळेल की अनेक शेतकर्‍यांची यापुढे अशीच फसवणूक चालु राहील हे पाहणे गरजेचे आहे. कृषी अधिकारी यांनी शेतात पाहणी करून हा प्रकार काय आहे. बियाणे कंपनीकडुन शेतकर्‍याची फसवणूक झाली आहे का हे पडताळून पाहण्याची गरज आता निर्माण झाली आहे.