अहमदपूर : विसाव्या शतकातील गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करावा, अशी मागणी येथील साहित्य संगीत कला अकादमीने केली आहे. शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर अकादमीच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन करून तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक तथा विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून प्रेम, शांती, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही सांस्कृतिक व कलेच्या क्षेत्रातील गानकोकिळा लता मंगेशकर, शहनाई वादक उस्ताद बिस्मीलाखाँ, सूब्बालक्ष्मी यांना भारतरत्न किताब देवून सरकारने त्यांच्या कलेचा गौरव केला आहे. वास्तविक मोहम्मद रफी यांच्यासारखा अष्टपैलू गायक आतापर्यंत झाला नाही व भविष्यात असा गायक होईल असे वाटत नाही. ते हयात असताना हा बहुमान भारत सरकारला देता आला नाही. तरी पद्मश्री मोहम्मद रफी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून त्यांच्या व त्यांच्या कलेचा गौरव करावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष यूवकनेते डॉ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष सय्यद याखूब, सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, अ‍ॅड. अमोल इरले, गोविंदराव कांबळे, पठाण मोहम्मद, सय्यद नौशाद, शहारूख पठाण, बालाजी पवार, संतोष मूंडे, शेख दस्तगीरभाई, राहूल सूर्यवंशी, रामानंद मूंडे, गौतम गायकवाड, कमलबाई थिट्टे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.