लातूर : जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, खड्डे बुजविण्याचे काम तसेच अपूर्ण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेने लवकर आणि गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार करावी. जिल्ह्यातील सर्व रस्ते व पाणंद रस्ते दुरुस्ती करुन सक्षम करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती यावर नियोजन करण्यासाठी आढावा बैठक शासकीय विश्रामगह येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या बैठकीस महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वनील पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, उपभियंता रोहन जाधव, उपअभियंता ओमप्रकाश सारडा, नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता स्वामी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यशवंत लवटे, जि.प.चे श्रीनिवास गंगथडे, नियोजन समिती सदस्य समद पटेल, विजय देशमुख, नारायण लोखंडे, सुभाष पवार यांच्यासह पदाधिकारी तसेच रस्ते बांधणी-दुरूस्तीशी सबंधित सर्व विभागाचे पदाधिकारी व अधिकारी आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. पालकमंत्री देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेले रस्ते व जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले रस्ता दुरुस्तीचा व रस्त्यातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा नवीन आराखडा तयार करावा. तसेच जिल्ह्यातील किती रस्ते सुस्थितीत आहेत आणि किती रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याबाबतचा सविस्तर आढावा सादरीकरणाद्वारे यापुढील बैठकीत सादर करावा. तसेच यापूर्वीच्या नवीन रस्त्यांची सद्यस्थिती कशी आहे. याबाबतही सर्व संबंधित विभागांनी याचा आहवालही सादर करावा. जि.प.ने व सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यांची कॅटीगिरीनिहाय महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्तीसाठीचे प्रस्तावही सादर करावे. तसेच प्रत्येक गावाला जोडण्यात येणारे रस्तेही नादुरुस्त आहेत, तेही तात्काळ दुरुस्ती करावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. जि.प.ने बारमाही असलेल्या रस्त्यांची यादी प्रसिध्दी करावी. तसेच येत्या दोन- ते-तीन महिन्यांत रस्त्यातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, शासकीय यंत्रणेने अत्यंत जबाबदारीने रस्त्याची कामे पार पाडावी. जिल्हा परिषदेने रस्त्यांची तुकड्यात काम न करता पूर्ण रस्त्याचे काम करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

निकृष्ट दर्जाची कामे करणार्‍या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ठ करा : अलीकडच्या काळात रस्ते बाधकाम करताना कंत्राटदारावर दोषदायित्वासंबंधी बंधने घालून दिले आहेत. त्याप्रमाणे त्या कंत्राटदाराकडून रस्ते दूरूस्ती होत आहे की नाही हे पहावे यात निष्काळजीपणा आढळून आल्यास त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ठ करण्याच्या स्पष्ट सुचनाही पालकमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या.


स्वेटर विक्रेते यांच्यासाठी भाडे तत्वावर जागा उपलब्धतेबाबत : लातूर येथील स्वेटर विक्रेते यांच्यासाठी भाडे तत्वावर जागा उपलब्धतेबाबत बैठकीत बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, महापालिकेने न्यायिक तत्वावर व कायद्याच्या चौकटीत सर्वांना न्याय मिळेल या दृष्टीने कार्य करा. तसेच लातूर येथील स्वेटर विक्रेत्यावर गाळे मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. या बैठकीत महानगर पालिकेतंर्गत शादीखान्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.

थर्ड पार्टी एजन्सी नेमणूक करुन रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासावा : रस्ते दुरूस्तीची मोहिम राबविण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी थर्ड पार्टी एजंन्सीची नेमूणक करुन जिल्ह्यातील एकूण रस्त्यांची विभागनिहाय माहिती जाणून घ्यावी. यात कंत्राटदार आणि संबंधित बांधकाम विभाग अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा आहे की नाही हेही तपासून घ्यावे. त्यानंतर कालबध्द कार्यक्रमानुसार संबंधिताकडून दुरूस्ती करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.