परळी वैजनाथ : राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजन काट्याची शासनाच्या वैधमापन खात्याच्या विशेष भरारी पथकाने तपासणी केली. या तपासणीत वैद्यनाथ कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे दिसून आले. वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही, तसा अहवाल वैधमापन खात्याच्या पथकामार्फत देण्यात आला असल्याची माहिती वैद्यनाथचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी दिली.

यंदाचा गळीत हंगाम चालू असून साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या विशेष भरारी पथकाने मंगळवार, दिनांक 19 जानेवारी रोजी कारखान्यास अचानक भेट देवून वजन काट्याची तपासणी केली. सध्या शासनाच्या आदेशानुसार सर्वच कारखान्याची तपासणी केली जात असुन त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत वैद्यनाथ साखर कारखान्याचे वजन काटे हे अचूक आढळून आले असून तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी दिली आहे.  नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक पी. बी. मेने, लेखापरिक्षक श्रेणी-1 ए. बी. नागरगोजे, शेतकरी प्रतिनिधी लक्ष्मण भरत सोळुंके, माणिक रेऊ पवार , पोलीस प्रतिनिधी रामचंद्र केकान यांच्या विशेष पथकाने कारखान्यास भेट देऊन कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली.