परभणी : मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले परभणीचे कापूस फेडरेशन पुन्हा सुरु करण्याची मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. ही मागणी मंजुर करीत परभणी येथील कापूस फेडरेशन त्वरीत सुरु करण्याचे आदेश राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ प्रधान कार्यालय नागपूरचे सचिव ज.प्र. महाजन यांनी दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजी विभागीय व्यवस्थापकांना दिले. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या मागणीस शासनाने त्वरीत मंजुरी दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले कापूस फेडरेशन सुरु करण्यास यश आले आहे.

परभणी जिल्हा कापूस उत्पादक शेतकर्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी लाखो क्विंटल कापूस उत्पादित केला जात असून
फेडरेशन बंद असल्यामुळे शेतकर्यांना आपला कापूस विकण्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. या बाबतीत शेतकर्यांच्या वतीने शासन दरबारी अनेकदा निवेदने देण्यात आली. याविषयी आ. डॉ. राहुल पाटील यांची परभणीतील शेतकर्यांनी भेट घेवून कापूस फेडरेशन करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आ. डॉ. राहुल पाटील यांनी मागील आठवड्यात राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून परभणीचे कापूस फेडरेशन त्वरीत सुरु करण्याची मागणी केली होती. ही मागणी शासनाने त्वरीत मान्य करुन परभणी केंद्रावर महासंघाची कापूस खरेदी सुरु करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्याकरीता परवानगी दिली.

याद्वारे खरेदी प्रक्रिया विभागाद्वारे वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश पणन महासंघाचे सरव्यवस्थापक ज.प्र. महाजन यांनी दिले आहेत. मागणी मान्य केल्याबद्दल परभणीतील शेतकर्यांच्यावतीने आ.डॉ. राहुल पाटील यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत. आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आ. डॉ. राहुल पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, बाजार समितीचे संचालक सोपानराव आवचार, संदीप झाडे, फैजुल्ला पठाण आदी उपस्थित होते.