वडीगोद्री - रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळपासून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले.सध्या डाव्या कालव्यातून 100 क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे.

सध्या जायकवाडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्याचे निर्णय पाटबंधारे विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.त्यानुसार जायकवाडी प्रशासनाने सोमवारी संध्याकाळी धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्युसेस प्रमाणे पाणी सोडण्यास सुरुवात केली.डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा औरंगाबाद,जालना व परभणी जिल्ह्यातील लाखो एकर शेतजमिनीसाठी फायदा होणार आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामातील गहू,बाजरी,ज्वारी,तूर, हरभरा,सोयाबीन,मका,ऊस आदी पिकांची लागवड व लागवड करण्यात आलेल्या पिकांना पाणी देत आहे.डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचा या पिकांना व तसेच ऊस या बारमाही पिकाला व डाळिंब व मोसंबीच्या फळबागांना फायदा होणार आहे.

तसेच डाव्या कालव्यावरील वितरीकांची दुरूस्ती झालेली नाही.या वितरीकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.त्यामुळे हे शेतात जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे.यामुळे शेवटच्या शेतकर्‍यांपर्यत पाणी पोहचण्याची शक्यता फार कमी दिसून येत आहे.यामुळे शेतात पाणी उशीरा पोहोचणार आहे.तसेच पाण्याचा अपव्यय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोमवारपासून शंभर क्युसेक प्रमाणे पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले.टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येणार असल्याच जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे दफ्तर अधिकारी एम.बी.शेख सांगितले.