फुलंब्री : फुलंब्री तहसील कार्यालयासमोर फुलंब्री तालुक्यातील इतर गावात नेमून दिलेले संग्राम केंद्र, सेतू केंद्र, महा-इ-सेवा केंद्र हे नेमून दिलेल्या गावात नागरिकांना सेवा न देता फुलंब्री तहसील कार्यालयासमोर अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन नागरिकांना प्रमाणपत्र वाटप करण्याची दुकाने थाटली आहे. त्यामुळे अशा अनधिकृत केंद्र चालकांवर तहसीलदाराने कारवाई करावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. 
शासनाकडून सर्व सामान्य नागरिकांना आपल्याच गावात तातडीने ऑनलाइन प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी संग्राम केंद्र, सेतू केंद्र, महा-इ-सेवा केंद्र गावागावात नेमून दिले आहेत. जेणेकरून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या विविध कामासाठी लागणारे शासकीय प्रमाणपत्रे गावातच मिळावी. तसेच नागरिकांची हेडसांड व आर्थिक खर्च कमी व्हावा. यासाठी नेमणूक केली आहे. परंतु हे केंद्र चालक नेमून दिलेल्या गावात नागरिकांना सेवा न देता गावाच्या नावावर मिळालेले केंद्र थेट तहसील कार्यालयासमोर अनधिकृत दुकाने थाटून पैसे कमावण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. शासनाने विविध प्रकारचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शुल्क ठरवून दिलेले आहे. मात्र या केंद्र चालकांनी शासनाने ठरवून दिलेले शुल्क न आकारात आपल्या मर्जीने जास्तीचे पैसे घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्याचा धंदा सुरू केला आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने सुरू केल्या जात नाही. यामुळे आपल्या विविध कामासाठी लागणारे प्रमाणपत्र घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत  आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. अशा अनधिकृतपणे केंद्र चालवून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुदंड देणार्‍या केंद्र चालकांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.