लोहगाव : मुलानी वाडगाव ते तारू पिंपळवाडी या रस्त्याची संपूर्णतः वाट लागली असून यामुळे नागरिकांसह वाहनधारक मोठे त्रस्त झाले आहेत.
पैठण तालुक्यातील पुनर्वशीत असलेल्या तारु पिंपळवाडी, शेवता तसेच शेवगाव तालुक्यातील विजयपूर ही गावे आरोग्य, शाळा या दृष्टीने महत्वाचे आहेत. मात्र हा रस्ता अतिशय खराब झाल्याने या सेवा नागरिकांना मिळणे मुष्किल झाले आहे. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित झाला आहे. दरम्यान या रस्त्यावर वाहन चालवणे व वरील गावातील पेशन्ट, शाळतील विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात  या रस्त्याने  जाणे अवघड  झाले असून लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडणार असल्याचा संकल्प सरकारने केला असला तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आजही बहुतांश गावे एकमेकांना डांबरी रस्त्याने जोडलेले दिसत नाही. ग्रामीण भागात दळण वळणाच्या सुविधा देण्यावर जरी शासनाचा भर असला तरी या सुविधा ग्रामीण भागात पोहचल्याचे दिसत नाही. अशीच अवस्था मुलांनी वाडगाव फाटा ते तारू पिंपळवाडी या 3 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची झाली आहे. वाहन चालकांना जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता पूर्णपणे उखडला असून वाहन चालविणे तर दूरच पायी चालणे देखील अवघड झाले आहे. या रस्त्यात अनेक किरकोळ अपघात देखील झाले आहेत. अनेकांकडून बहुतांश वेळा हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. परंतु कोणालाच या रस्त्याविषयी काही देणे-घेणे राहिलेले दिसत नाही. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. तर स्थानिक लोकप्रतिनिधीनी विशेष लक्ष घालून सदर रस्त्याचे काम करून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव दिला होता. पण अजूनही या रस्त्याचे काम संबधित विभागाने हाती घेतलेले नाही.
-मुमताज बी शब्बीर शेख, सरपंच, शेवता.