परळी वैजनाथ - राखेचे प्रदूषण व राख वाहतूक वेगमर्यादेसह नियंत्रित करून सामान्य जनतेच्या आरोग्याचे पर्यायाने माणसांच्या व पशुधनाच्या जीवनाचे, शेतजमिनीचे संरक्षण करणे यांसह विविध अठरा मागण्यांचे निवेदन 21 जानेवारी रोजी शासनास उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण समितेने दाखल केले. परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होत असलेल्या राखेच्या प्रदूषणामुळे व अनियंत्रित वाहतुकीमुळे येथील नागरिकांचे आयुरारोग्य, पशुधन, शेती व्यवसाय प्रचंड धोक्यात. राखेवर अवलंबून असलेल्या वीट भट्ट्यांमुळेही प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याने मोकळा आणि स्वच्छ श्वास घेण्याचा भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आली आहे. त्यामुळे याबाबत आपण योग्य ती कारवाई करून सामान्य जनतेला न्याय मिळावा अशी शासनाकडून अपेक्षा आहे.

येथील औष्णिक विद्युत केंद्र हे आपले वैभव आहे. थर्मल तसेच वीट भट्टी उद्योगावर हजारो लोकांचे रोजगार अवलंबून आहे त्यामुळे हे उद्योग बंद करावेत किंवा त्यांची मुस्कटदाबी करावी, अशी मागणी कोणताही सुज्ञ नागरिक करणार नाही. पण, लोकांचे आयुरारोग्य ध्यानात ठेऊन आपण यातून सुवर्णमध्य साधून प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या आधीही नागरिकांनी राख प्रश्नी आंदोलन केल्यावर प्रशासनाने काही सूचना केल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी संबंधित अधिकार्‍यांनी न केल्याने राख प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.