पैठण : शेतालगत असलेल्या नदीतून अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यासाठी 1 लाख 30 हजार रूपये लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदार चंद्रकांत शेळके मध्यस्थ खासगी इसम नारायण वाघ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली असून शनिवार रोजी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबाद लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.25) दुपारी एक वाजता तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या दालनाची झाडाझडती घेत आरोपी विरुद्ध भक्कम सबळ पुरावा म्हणून तहसीलदार यांच्या दालनातील तसेच दालनाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दोन शासकीय पंचा समक्ष संबधित दस्तावेज जप्त केल्याने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना कोर्टाकडून जामीन मिळण्यास अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवार रोजी सायंकाळी गंगापूर -पैठण हद्दीतील शेंदुरवादा येथील फिर्यादीच्या शेतात लगत असलेल्या खांब नदीतून अतिवृष्टीमुळे जमा झालेली अवैध  वाळू उपसा व हायवा ट्रक द्वारे वाहतूक करण्यासाठी संबधित वाळू व्यवसायिक यांच्याकडून खाजगी मध्यस्थ इसम नारायण वाघ यांच्यामार्फत 1 लाख 30 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. मात्र संबधित फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी  शुक्रवारी संध्याकाळी पैठण तहसील कार्यालयात सापळा रचला. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी फिर्यादिस खासगी इसम नारायण वाघच्या मार्फत अवैध वाळू व वाहतूक करण्यास प्रति महिना 1 लाख 30 हजार रुपये देण्याची मागणी केली. संबधित मागणी ही ऑन रेकॉर्ड झाल्याने या प्रकरणी तहसीलदार शेळके व नारायण वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले असून अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्या टीमने सोमवार दुपारी तहसीलदार यांच्या दालनासह तेथील शासकीय दस्तावेजाची झाडाझडती घेतली असून आरोपी विरुद्ध काही ठोस पुरावे मिळतात का, यासाठी लाचलुचपत विभागाकडून  प्रयत्न सुरू आहेत. यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय निलावड, अव्वल कारकून राजेंद्र टोणगे, बचाटे, जनार्दन दराडे यांनी सहकार्य केले.