परभणी : औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात 78 केंद्रावर 32 हजार 715 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी(दि.28) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी(निवडणुक) निवृत्ती गायकवाड, नानासाहेब भेंडेकर आदीची उपस्थिती होती.जिल्ह्यातील 78 केंद्रावर 6 हजार 770 महिला तर 25 हजार 945 पुरूष असे एकूण 32 हजार 715 पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्व मतदान केंद्रावर कोव्हीडच्या अनुषंगाने सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मास्कचा पुरवठा करून सॅनिटाईझर, थर्मलस्क्रीनिंग, ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करून घेण्यात येणार आहे. सोमवारी(दि.30) रोजी मतदान पथके केंद्रावर रवाना होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्य वाटपासाठी 10 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.मतदान प्रक्रियेसाठी 30 क्षेत्रीय अधिकारी, 67 एकूण रूट गाईड, 374 मतदान अधिकारी,कर्मचारी, 100 सुक्ष्म निरीक्षक, 12 आरोग्य नोडल अधिकारी, 156 आरोग्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रावर चित्रीकरण केले जाणार आहे. 78 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर जाणा-या सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतपेट्या असलेले वाहन व मतदान पथकाच्या वाहनास जीपीएस बसविण्यात येणार आहे. 2014 च्या पदवीधर निवडणुकीत एकूण पदवीधर मतदारसंख्या 31 हजार 624 एवढी होती. त्यापैकी 11 हजार 139 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्याची टक्केवारी 35.22 एवढी होती. मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. 31 दिव्यांग मतदारांपैकी 6 जणांनी टपाली मतदान केले असून 25 जण प्रत्यक्ष केंद्रावर येवून मतदान करणार आहे. 80 वर्षावरील 8 ज्येष्ठ नागरिकांनी टपाली मतदान केले असून 7 जण प्रत्यक्ष केंद्रावर येवून मतदान करणार आहेत. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा करून त्या औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्ट्रॉगरूमकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.