बीड : श्रीक्षेत्र नगद नारायण गडाच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात 25 कोटींची घोषणा केली होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. आता गडाच्या विकासासाठी 25 कोटी रुपये लवकर उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. बीड येथील अमरसिंह पंडित यांचे निवासस्थान असलेले ’शिवछत्र’ येथे पालकमंत्री धनंजय  मुंडे यांच्याशी सोमवारी (दि.22) फेब्रुवारी रोजी मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्याशी गडाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, बबन गवते, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, बीड पंचायत सभापती बळीराम गवते यांची उपस्थिती होती. 

यावेळी मुंडे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात गडाच्या विकासासाठी 25 कोटी देऊ, असा तत्कालीन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिला होता. यातील दोन कोटींच्या कामाला मान्यता मिळाली मात्र उर्वरीत निधी दिलेला नाही. गडाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा बनवलेला आहे. या आराखड्यातील कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. आराखडा पुन्हा सादर करावा लागणार असून त्याला मंजुरी मिळविण्याची जबाबदारी मी घेत आहे. लवकरच गडाला 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गडावर यात्रास्थळ, मंदिरातील विधुतिकरण, सौर यंत्रणा, विद्युत निर्मिती, मंदिर परिसरातील दगडी फरशी बांधकाम करणे, प्रसादालय, सार्वजनिक शौचालय, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि बाग, रस्ते रुंदीकरण, गोशाळा, दवाखाना, संस्थानच्या परिसरात वाटर शेड मॅनेजमेंट, पाण्याची टाकी, रस्ते विकास, तट बंदी व गेट, कर्मचार्‍यांसाठी राहण्याची व्यवस्था, गेस्ट हाऊस, मल्ल निवास, वेस, मल्ल आखाडे, जिम मंडप, तालीम, सार्वजनिक शौचालय, अध्यात्मिक केंद्र, आयुर्वेदिक केंद्र, बोटणीकल बाग, पेरिफेरी लँडस्केप, ग्रीन हाऊस, भक्त निवास, शाळा, मुला मुलींसाठी वसतिगृह, वाचनालय, क्रीडा संकुल, सांस्कृतिक सभा केंद्र, उद्यान, वृद्धश्रम, पोलीस चौकी, बस स्टँड, रिक्षा स्टँड, काळी पिवळी स्टँड, वाहनतळ, उपहार गृह, दुकाने आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी लागणारा निधी कमी पडणार नाही, याची पूर्णपणे जबाबदारी आपली आहे, असेही मुंडे म्हणाले.