सेलू : तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दुपारपासून जोरदार झाली. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळी साडे सहा ते मंगळवारी (21 सप्टेंबर) पहाटे दीड वाजेपर्यंत बारा दरवाजे, तर सकाळी आठच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चौदा दारे 0.60 मीटरने उघडून 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
यामुळे सेलू- देवगाव फाटा मार्गे औरंगाबाद, जिंतूर कडे जाणारी वाहतूक तसेच अतिवृष्टी व मोठ्या विसर्गाने पूरस्थिती निर्माण झाली आहे.  परिणामी तालुकांतर्गत मुख्य रस्ते व जोडरस्त्यावरील नदी, नाल्यांना, ओढ्यांना पूर आला आहे. येथील कमी उंचीच्या पुलांवर पाणी वाहत असल्याने सुमारे 55 हून अधिक गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे. नदीकाठच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. यामुळे  पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात गेल्या 24 तासांत 48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 5464 क्युसेक्स दराने धरणात पाणी आले असून सकाळी साडे सहा वाजेपर्यंत 13.367 दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

जोरदार पावसाची हजेरी : धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठपासून दहा वाजेपर्यंत लाभक्षेत्रातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने द्वार क्रमांक एक ते सात व चौदा ते 0.60 मीटरने उघडण्यात आली आहेत.त्या द्वारे 30 हजार 324 क्युसेक ( प्रति सेकंद 8 लाख 58 हजार 432 लिटर ) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.अशी माहिती निम्न दुधना प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. मोरगाव येथील दुधना नदी वरील जुन्या पुलावरून पाणी वाहत असून त्यामुळे सेलू- देवगाव फाटा मार्गे औरंगाबाद जिंतूर व विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.