जळगाव - जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आले. शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी दाखल झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भावाने मुखाग्नी देताच उपस्थितांना गहिवरून आले होते. 

शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दाखल झाले. त्यासाठी खास हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीतून त्यांचे पार्थिव नाशिक येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आठ वाजता पिंपळगाव येथे दाखल झाले.

शहीद जवान यश देशमुख यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थही पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या वीर मुलाची वाट पाहत होते. हुतात्मावीर यश देशमुख यांच्या पार्थिवाला अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी असंख्य नागरिक जमा झाले होते.यावेळी पिंपळगावात 'शहीद जवान यश देशमुख अमर रहे... भारत माता की जय... वंदे मातरम'चा जयघोष सुरु होता. यावेळी कृषी तथा सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांना राज्य सरकार तर्फे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केली.

यश देशमुख हे अवघ्या २२ वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर येथे त्यांना तैनात करण्यात आले होते. यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचे आकर्षण होते. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत सैन्य दलात भरती झाले होते. दोनच दिवसांपूर्वीच त्यांनी घरी फोन करून कुटुंबीयांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. हा त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संवाद होता. यश यांची शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या आईला मोठा धक्का बसला आणि त्या बेशुद्ध झाल्या. यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असे कुटुंब आहे. यश देशमुख शहीद झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.