मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी खडसेंनी त्यांच्यासोबत भाजपमध्ये झालेल्या भेदभाव आणि अन्यायायवर भाष्य केले. तसेच त्यांनी काही वर्षांत राष्ट्रवादी पक्षवाढीचा शब्द शरद पवारांना दिला.

दरम्यान एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात कोणते स्थान दिले जाणार याची चर्चा होत होती. त्यासाठी मंत्रिमंडळात बदल केले जातील, असेही अंदाज वर्तवले जात होते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीचे अनेक नेते अस्वस्थ झाले होते. मात्र आता या चर्चेंना पूर्णविराम लागला आहे.

आज खडसेंच्या पक्षप्रवेशादरम्यान शरद पवारांनी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नसल्याचा मोठा खुलासा केला. खडसे राष्ट्रवादीत आले असले तरी त्यांना अद्याप कोणतेही पद दिलेले नाही. याशिवाय या पक्षप्रवेशादरम्यान स्वत: एकनाथ खडसे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नसल्याचे स्वत: शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे खडसेंच्या पदाच्या चर्चांना थांबल्या आहेत.

मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करण्यात येणार नाही. त्यात काहीच बदल होणार नाहीत. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती. पण काही लोकांनी खडसेंनी मंत्रिपदाची मागणी केल्याचे वृत्त पसरवले होते. त्यात काहीच तथ्य नसून नाथाभाऊंनी चर्चा करताना एकाही शब्दाने पदाची अपेक्षा केली नाही, असे सांगून जयंतराव पाटीलांच्या नेतृत्वात पक्षाचे काम चांगले सुरू आहे. आता नाथाभाऊंच्या साथीने ते पक्ष वाढवतील. नाथाभाऊंच्या अनुभवाचा फायदा होईल. त्यामुळे खडसेंकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.