अहमदनगर : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. 28 वर्षीय पत्नीने घरात आपली जीवनयात्रा संपवली, त्यानंतर कार्यालयात पतीने गळफास घेत आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात या नवदाम्पत्याने आपले आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 

चार महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 28 वर्षीय शिल्पा आणि 32 वर्षीय अजय कचरदास जाधव यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. शहरातील बीड रोडवर आदित्य गार्डन शेजारी जाधव दाम्पत्य राहत होते. शिल्पा जाधवने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी अजयला समजली. या घटनेमुळे अजयला धक्का बसला. काही तासातच त्यानेही मोरे वस्तीमधील पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

अजयने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येला मी जबाबदार असून कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे. 

अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधवने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती दिली. अजय आणि शिल्पा यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.