मुंबई - भाजप नेते विनोद तावडे यांनी विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तेव्हा विविध पक्षातील बड्या नेत्यांचे फोन आल्याचा दावा केला.

ते म्हणाले, 'विधानसभा निवडणूकीच्या वेळी तिकीट मिळाले नाही तेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे अशा अनेक विविध पक्षातील नेत्यांचे फोन आले होते. परंतु भाजप सोडा आणि आमच्याकडे या अशी म्हणायची हिंमत कुणीच केली नाही. कारण त्यांना ठावूक होते, की मी पक्का संघवाला, विद्यार्थी परिषदेचा आहे.'

पुढे बोलताना तावडे म्हणाले, 'पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बरं वाटतं. परंतु काही वेगळा काही निर्णय घेतला तर वाईट वाटून घेवू नये. कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिले नाही तर वाईट का वाटले पाहिजे? मला ज्ञानेश्वरीमधील एक ओवी आठवतेय, 'भुंगा लाकूड कुरतडू शकतो, पण तो कमळात अडकला तर त्याच्या पाकळ्या तोडत नाही. तर मग आपण ते का करायचं.'

भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवलीमध्ये विनोद तावडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.