अहमदनगर : ऊसतोड कामगारांच्या आंदोलनावरुन राजकरान पेटलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी टिका केली आहे. आंबेडकर म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये. त्यांनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी, अशी टिका प्रकाश आंबेडकरांनी पंकजा मुंडेंवर केली आहे.


ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज रविवारी दि.25 रोजी भगवानगडाच्या पायथ्याशी ऊस कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडेंवर टिका केली.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ऊस कामगारांना आणखी काही दिवस आंदोलन सुरु ठेवावे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी चालून आली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


कामगारांनी कारखानदारांचे नाक दाबून ठेवले  : ऊसतोड कामगारांनी आंदोलन हीसका दाखवल्यामुळे साखर कारखानदारांचे नाक दाबले आहे. साखर कारखान्यांनी मशीन्सच्या साहाय्याने ऊस कापायचे ठरवले तरी 100 टक्के ऊसाची कापणी शक्य नाही. मशीन ही सहा इंचवरून ऊस कापते. मात्र, जास्त साखर ऊसाच्या खालच्या पेरात असते. त्यामुळे ऊसतोड कामगारांना मशीनच्या कापणीइतका दर मिळू शकतो. त्यासाठी आणखी काही काळ तग धरण्याची गरज असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.